परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शक ध्वनीचकत्या ऐकतांना गाढ झोप लागणे आणि जाग आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्य अंतर्मनापर्यंत खोलवर झिरपल्याने त्यातून नवीन सूत्रे शिकायला मिळणे
‘मी गावाला (नाटे, जिल्हा रत्नागिरी) घरी असतांना रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन असणाऱ्या साधना, शंकानिरसन इत्यादी ध्वनीचकत्या रात्रभर लावतो. त्यामुळे मला चैतन्य मिळते आणि नवीन सूत्रेही शिकायला मिळतात. गेले काही मास त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना मला गाढ झोप लागते; पण त्या वेळी मार्गदर्शनही ऐकू येत असते आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहेत’, असेही मला दिसते. काही वेळा मार्गदर्शन संपल्यावर मला जाग येते (साधारण ५ घंट्यांनी), त्या वेळी माझी झोप पूर्ण झालेली असते आणि मला नवीन सूत्रे शिकायला मिळतात. आता याची वारंवारता वाढत आहे. मला याचा नेमकेपणाने अर्थ न कळल्याने मी त्याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘छान अनुभूती आहे. स्थूलदेह झोपला असला, तरी परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन अंतर्मन जागृत होऊन ऐकत आहे, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्य अंतर्मनापर्यंत खोलवर झिरपत आहे. त्यामुळे जाग आल्यावर नवीन सूत्रे शिकायला मिळतात.’’ – श्री. विवेक प्रभाकर नाफडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |