६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांना वर्ष २०२० मध्ये रामनाथी आश्रमात ‘कोरोना’संबंधी शासकीय नियम पाळून साजऱ्या झालेल्या ऑनलाईन गुरुपौर्णिमेविषयी आलेल्या अनुभूती
१. वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘पुढे आपल्याला गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला मिळेल कि नाही, हे ठाऊक नाही’, या वाक्याची प्रचीती येणे
‘आम्हा साधकांसाठी ‘गुरुपौर्णिमा’ हा पर्वणीचा दिवस ! प्रत्येक साधक या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. काही वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सांगत आहेत, ‘‘कदाचित् ‘साजरी करता येईल’, अशी ही शेवटची गुरुपौर्णिमा असेल’, असा भाव ठेवून तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक सेवा करून साधनेच्या दृष्टीने सहस्रो पटींनी लाभ करून घ्या. ‘पुढे आपल्याला गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणावर साजरी करायला मिळेल कि नाही ?’, हे ठाऊक नाही.’’ वर्ष २०२० मध्ये ‘कोरोना महामारी’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा साजरी करतांना सर्व साधकांना त्यांच्या या उद्गारांची प्रचीती आली; मात्र ‘देवाचे कार्य कधीच थांबत नाही’, हेही साधकांना अनुभवता आले. त्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात ‘कोरोना’संबंधी शासकीय नियम पाळून गुरुपूजन करण्यात आले आणि ते सर्वत्रच्या साधकांना ‘ऑनलाईन’ दाखवण्यात आले. नंतर सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या संग्रहित ध्वनीचित्र-चकत्या दाखवण्यात आल्या.
२. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तोरणे आणि हार बनवण्याची सेवा करतांना कृतज्ञता वाटणे
गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवाने मला गुरुपूजनाच्या ठिकाणी सजावट करण्यासाठी तोरणे आणि हार बनवण्याच्या सेवेत सहभागी होण्याची संधी दिली. ती सेवा करतांना मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून आनंद झाला. त्या रात्री मला निरोप मिळाला, ‘तुम्ही सकाळी गुरुपूजनाच्या ठिकाणी उपस्थित रहा.’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एकाग्रतेने आणि भावपूर्ण गुरुपूजन करतांना ‘चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे जाणवणे अन् तिथे उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटून भावाश्रू येणे
गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘मला फुलांची किंवा पूजेशी संबंधित सेवा असणार’, असा विचार करून मी गुरुपूजनाच्या ठिकाणी गेले. त्या क्षणापासून माझी भावजागृती होत होती. महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुपूजनासाठी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील चित्र ठेवल्याचे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘सनातन पुरोहित पाठशाळे’चे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी आणि अन्य पुरोहित साधक पूजनासंबंधी सेवा करत होते. नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपूजनातील प्रत्येक कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करतांना ‘त्या पूजनाच्या सेवेशी एकरूपच झाल्या आहेत’, असे मला वाटले. गुरुदेवांच्या चित्रातून सभोवती मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. ते पहातांना माझे डोळे दीपत होते. काही वेळा त्या चित्राकडे पहाणेही मला शक्य होत नव्हते. त्या वेळी ‘जणूकाही बर्फाचा पाऊस पडावा’, अशा प्रकारे वरून मोठ्या प्रमाणात चैतन्याचे कण खाली पडत असल्याचे मला सूक्ष्मातून दिसले. गुरुपूजनानंतर सद्गुरूंची आरती अतिशय भावपूर्ण झाली. माझे भावाश्रू थांबतच नव्हते. तेव्हा ‘मी एका वेगळ्याच विश्वात आहे’, असे मला वाटत होते. नंतर तो विधी प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य लाभल्याने मला कृतज्ञता वाटली.
४. साधिकेने संकलित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते होतांना पाहून तिचे मन कृतज्ञताभावाने भरून येणे आणि गुरुदेवांनी तिला ‘हा ग्रंथ अप्रतिम झाला आहे’, असे सांगून प्रसाद देणे
आरती झाल्यावर रामनाथी आश्रमातील संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी ‘श्रीमती स्मिता नवलकर यांच्याकडून गुरुदेवांनी संकलित करून घेतलेल्या ‘धर्मकार्यासाठी जाहिराती आदी अर्पण मिळवणे, ही समष्टी साधना !’ या ग्रंथाचे प्रकाशन श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हस्ते होत आहे’, असे घोषित करताच मी स्तब्ध झाले. त्या वेळी मला सुखद धक्का बसला. त्या दिवशी गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला भरभरून आनंद दिला. त्या वेळी माझे मन कृतज्ञतेने भरून आले आणि मी गुरुचरणी नतमस्तक झाले. त्या दिवशी संध्याकाळी गुरुदेवांनी त्या ग्रंथाचे सूक्ष्म परीक्षण करून सांगितले, ‘‘हा ग्रंथ अप्रतिम झाला आहे. या ग्रंथात पुष्कळ शक्ती आणि चैतन्य आहे. हा ग्रंथ भारतभरातील साधकांसाठी उपयुक्त ठरेल अणि त्यांना साधनेची योग्य दिशा मिळेल.’’ नंतर त्यांनी मला प्रसादही दिला. माझ्या साधनेच्या काळातील ही पहिली गुरुपौर्णिमा, ज्या दिवशी गुरुदेवांच्या चित्राचे पूजन झाले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला त्यांचे दर्शन होऊन ‘गुरुप्रसाद’ही मिळाला. त्या वेळी मला वाटत होते, ‘माझे पाय भूमीवर नसून मी आनंदात तरंगत आहे.’ तो माझ्या आयुष्यातील सर्वांत अनमोल क्षण होता.
५. प्रार्थना
गुरुदेवांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. गुरुदेवा, ‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या चरणांशी ठेवा आणि तुमच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात मला सहभागी करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२९.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |