…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता
चीनच्या अरब महासागराशी थेट संपर्क ठेवण्याच्या महत्वाकांक्षेवर फिरणार पाणी !
क्वेट्टा (पाकिस्तान) – चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते. या आर्थिक महामार्गाचा बलुचिस्तान प्रांतातील ‘ग्वादर बंदर’ महत्त्वपूर्ण भाग असून आता त्यालाच बंद करणार असल्याची चेतावणी स्थानिक पाकिस्तान्यांकडून देण्यात आली आहे.
पाकमधील बलूचिस्तानचा समुद्री किनारा ‘ट्रॉलर’संबंधी (मासेमारीसाठी यंत्र असणार्या बोटीचा वापर करणार्या) माफियांपासून मुक्त केला जावा, अमली पदार्थांची तस्करी रोखली जावी, अनावश्यक असणारे तपासणी नाके बंद करण्यात यावेत आदी मागण्यांसाठी ‘ग्वादर अधिकार आंदोलना’ने पाक सरकारला चेतावणी दिली आहे. पाकच्या इंग्रजी दैनिक ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार ‘ग्वादर अधिकार आंदोलना’चे नेतृत्व करणारे मौलाना (इस्लामी धार्मिक नेते) हिदायतुर रहमान बलोच यांनी म्हटले की, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर सरकारचा विरोध करण्यासाठी आम्ही ‘ग्वादर बंदर’च बंद करू. जमात-ए-इस्लामीचे प्रांत महासचिवही असलेले बलोच यांनी २१ जुलैपासूनच बंदर बंद करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.
Maulana Hidayatur Rehman Baloch, who led the Gwadar rights movement, has threatened to close the Gwadar port from July 21 if the demands agreed by the provincial government are not fulfilled.https://t.co/cONElEKkDL
— Dawn.com (@dawn_com) July 4, 2022
काही आठवड्यांपूर्वी बलूचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदूस बिजेंजो हे ग्वादर येथे आले होते. त्यांनी वरील मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले होते; परंतु त्या दिशेने विशेष काही काम केले जात नसल्याचे पाहून मौलाना बलोच यांनी बंदर बंद करण्याची चेतावणी दिली आहे.