सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान !
नूपुर शर्मा यांच्याविषयी केलेल्या विधानाचे प्रकरण
नवी देहली – ‘ नूपुर शर्मा या उदयपूर घटनेला (कन्हैयालाल यांच्या हत्येला) उत्तरदायी आहेत’ असे म्हटल्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक माध्यमांतून स्वाक्षरी अभियान राबण्यात येत आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे विकास पांडे यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. या स्वाक्षर्यांचे निवेदन खासदारांना देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात change.org या संकेतस्थळवरून हे अभियान राबवले जात आहे. आतापर्यंत यावर १० सहस्र लोकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.
महाभियोग म्हणजे काय ?
सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्या न्यायमूर्तींवर महाअभियोग चालवण्यासाठी राज्यघटनेच्या कलम १२४ (४) मध्ये तरतूद आहे. यात म्हटले आहे की, अकार्यक्षमता आणि अयोग्य वर्तन यांसाठी त्यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आणता येऊ शकतो. कलम १२४ नुसार यांना पदावरून हटवण्याचीही तरतूद आहे.