विधानसभा अध्यक्षविरोधी याचिकेवर ११ जुलैला निर्णय होणार !
मुंबई – शिवसेनेच्या वतीने नियुक्त केलेल्या प्रतोदना अवैध ठरवत एकनाथ शिंदे यांच्या गटाने नियुक्त केलेल्या प्रतोदच्या ‘व्हीप’ला मान्यता देण्याच्या नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका प्रविष्ट करून आव्हान देण्यात आले आहे; मात्र न्यायालयाने याचिकेवर ११ जुलै या दिवशी सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका प्रविष्ट करत तात्काळ सुनावणीची मागणी केली होती.
‘व्हीप’चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार ! – आदित्य ठाकरे
‘व्हीप’चे उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येणार आहे. आमचा जो व्हीप आहे, तो अद्याप कायम आहे. जे आमदार ‘जन्म पक्षा’त असे करू शकतात, ते ‘कर्म पक्षा’तही असे करू शकतात. मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण सिद्धतेत आहे. शिवसेना याहून अधिक आमदारांसह पुन्हा विधानसभेवर भगवा फडकवेल.