साधकांशी जवळीक साधून त्यांच्यावर प्रीतीचा वर्षाव करणाऱ्या आणि त्यांना आनंद देणाऱ्या रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षाचे दायित्व सांभाळणाऱ्या पू. रेखा काणकोणकर !
मी (श्री. दीप पाटणे) रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना पू. रेखाताईंची (पू. रेखा काणकोणकर सनातनच्या ६० व्या संत) अनुभवलेली प्रीती आणि मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रीती
१ अ. जवळीक वाटणे आणि बोलण्यातून प्रीती अनुभवणे : मी रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात प्रथमच पू. रेखाताईंना सेवा विचारण्यासाठी गेलो असतांना त्यांच्याकडे पहाताक्षणी ‘माझी त्यांच्याशी फार पूर्वीपासून ओळख आहे’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात मी पूर्वी त्यांना पाहिले नव्हते. माझ्या आश्रमातील ३ मासांच्या वास्तव्य काळात पू. ताई माझी येता-जाता अत्यंत आपुलकीने विचारपूस करत असत. त्यांच्या बोलण्यातूनच मला त्यांची प्रीती अनुभवता यायची.
१ आ. पू. रेखाताईंच्या प्रीतीमुळे घरी गेल्यानंतर आश्रमात परत येण्याची ओढ लागणे : मी आश्रमातून घरी गेल्यावर माझ्या मनाला पू. ताईंचा सत्संग आणि वैकुंठस्वरूप रामनाथी आश्रम यांची विशेष ओढ लागली. त्यामुळे अवघ्या
१६ दिवसांतच मी पुन्हा रामनाथी आश्रमात परत आलो.
१ इ. पू. रेखाताईंचा अनुभवलेला वात्सल्यभाव
१ इ १. पू. रेखाताईंनी साधकाला आठवणीने त्याच्या आवडीचे पदार्थ देणे : मला बाहेरचे चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होत असे. तेव्हा पू. ताई माझे खाण्या-पिण्याचे पुष्कळ लाड पुरवत असत. एकदा मी भोजनकक्षात जेवायला बसलो असतांना पू. ताईंनी मला स्वयंपाकघरात बोलावले आणि त्यांनी मला माझ्या आवडीची भाजी दिली. तेव्हा माझ्या ताटातील पोळी संपत आली होती; म्हणून त्यांनी मला पोळीही आणून दिली. त्या मला म्हणाल्या, ‘‘आणखी भाजी हवी असल्यास सांग.’’
१ इ २. पू. ताईंनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आवडते चॉकलेट देणे : २६.५.२०२१ या दिवशी माझा वाढदिवस होता. पू. ताईंनी सहसाधकांना माझ्या वाढदिवसानिमित्त सदरा घालून यायला सांगितले. वाढदिवसाच्या दिवशी पू. ताईंनी मला शुभेच्छा दिल्या आणि मला आवडणारे चॉकलेट दिले. वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात झालेला सुंदर आणि अविस्मरणीय वाढदिवस मी कधीही विसरू शकणार नाही.
२. उत्कृष्ट नियोजनकौशल्य
सणांच्या वेळी आश्रमात साधकसंख्या अल्प असतांना पू. ताई आणि सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) उपलब्ध साधकांच्या सेवांचे वस्तूनिष्ठ नियोजन करून वेगवेगळे अन् चविष्ट पदार्थ बनवतात.
३. साधनेत साहाय्य करणे
माझ्या संदर्भात घडलेले काही प्रसंग ज्याविषयी मी कधीच कोणाला सांगू शकत नव्हतो, त्याविषयी मी पू. ताईंना आणि माझा व्यष्टी साधनेच्या आढावा घेणाऱ्या सौ. सुप्रिया माथूर यांना सहजतेने सांगू शकलो. त्यांनी मला मार्गदर्शन करून साधनेत साहाय्य केले.
४. साधकांच्या मनातील विचार जाणणे
अ. एकदा मी ‘बॉयलर’मध्ये आमटी करत असतांना ‘मलाही चव घ्यायला शिकायचे आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्याचक्षणी पू. ताईंचा दुसरीकडून आवाज आला, ‘‘दीप, चव बघ रे.’’ तेव्हा ‘पू. ताई माझ्या मनातील विचार जाणतात’, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी माझ्या मनातील विचार अनेक वेळा ओळखल्याची मला अनुभूती आली आहे.
आ. मला भाकरी पुष्कळ आवडते. एकदा मी डब्यात भाकऱ्या भरत असतांना मला भाकरी खाण्याची इच्छा झाली. त्या वेळी सेवा संपल्यावर पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘तू जेवतांना भाकरी घे.’’
५. बंद झालेला दिवा पू. रेखाताईंनी विचारपूस केल्यावर त्वरित चालू होणे
एकदा मी आणि एक साधक भांडी घासण्याची सेवा करतांना तेथील दिवा गेला होता. तेव्हा पू. ताईंनी तेथे येऊन विचारले, ‘‘दिवा लागत नाही का ?’’ त्या तेथून गेल्यावर लगेच दिवा चालू झाला. आम्हाला त्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले आणि पू. ताईंची कृपा अनुभवता आली.
६. सूक्ष्मातील जाणणे
एकदा मी आणि पू. ताई जेवायला बसलो असतांना कु. दीपाली मतकरताईचा विषय निघाला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘दीपाली लवकर संत होईल.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘पुढच्या गुरुपौर्णिमेला का ?’’ नंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘ती याच वर्षी संत होईल.’’ त्यानंतर ४ – ५ मासांनी कु. दीपालीताई संत झाल्या.
७. साधकांतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा वृद्धींगत होण्यासाठी साधकांना प्रोत्साहन देणे
पू. ताई परात्पर गुरु डॉक्टरांच्या सेवेत असतांनाचे प्रसंग किंवा त्यांनी अनुभवलेले ‘गुरुदेव किती महान आहेत’, या आशयाचे प्रसंग मला सांगत असत. त्यामुळे माझ्यात गुरुदेवांप्रती भाव आणि श्रद्धा वृद्धींगत झाली.
मला साक्षात् अन्नपूर्णामातेच्या समवेत सेवेसाठी ठेवून, ज्यांनी माझ्या मनातील ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करवून घेतले, अशा श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
|