पांडुरंगाला शरण जा !

आषाढी एकादशी म्हटले की, पंढरपूरची वारी डोळ्यांसमोर येते. वर्षभरातील एकादशींमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. कोरोनाच्या संसर्गामुळे पंढरपूर येथे २ वर्षे आषाढी यात्रा भरली नव्हती. त्यामुळे या वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशभरातून सहस्रोंच्या संख्येने भाविक येत आहेत. आषाढी एकादशीला एका सप्ताहाचा कालावधी असतांनाच पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत पोचली आहे. प्रतिवर्षी पालखी सोहळे पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोचते. यंदा पालख्या जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातूनच भक्तांमध्ये पांडुरंगाविषयीच्या भक्तीचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात येते.

अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! भाविकांच्या संख्येतील वाढ हेच दर्शवत आहे, असे म्हणावे लागेल. पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे पंढरपूर ! अशा या पंढरपूरची महती कितीही वर्णन केली, तरी ती अल्पच आहे. ही महती जनसामान्यांच्या मनावर बिंबत आहे आणि पंढरपूर येथे कुणीही आमंत्रण न देता पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने भक्त तेथे पोचत आहेत, ही पांडुरंगाची लीलाच नव्हे का ?

0आता वारीच्या पार्श्वभूमीवर भक्तांची होत असलेली गर्दी आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांची सांगड प्रशासन कसे घालणार ? हे महत्त्वाचे आहे. गर्दीनुसार आवश्यकता निर्माण झाल्यास पदस्पर्श रांगेची लांबी आणखी वाढवण्यात येणार आहे. गर्दीनुसार विविध ठिकाणी अनेक गोष्टींच्या नियोजनामध्ये पालट करावे लागणार आहेत, हे नक्की ! आता होत असलेली गर्दी पाहून भक्तांना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने बुद्धीने विचार करून नियोजन केले, तर ते त्रुटींविरहित होईल का ? कारण मनुष्याची विचार करण्याची कुवत ही एका मर्यादेपर्यंत असते. त्याऐवजी सर्व शक्तीमान भगवंताचे साहाय्य घेतल्यास तो सर्वकाही व्यवस्थित करू शकतो. या वर्षीची वारी प्रशासनाला पांडुरंगाच्या चरणी शरण जाऊन नियोजन करण्याची संधी आहे. यातून ज्याप्रमाणे भक्त ‘पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे’, हे अनुभवतात, तसेच प्रशासन पांडुरंगाला शरण गेल्यास त्यांनाही त्याचे अस्तित्व अनुभवता येईल. प्रत्यक्ष पांडुरंगाला शरण जाऊन नियोजन केल्यास तो ‘कुठे काय करायला हवे’, हे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून सुचवेल आणि सर्व व्यवस्थित होईल, हे नक्की !

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, देवद, पनवेल.