परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अवस्था

परात्पर गुरु डॉक्टर शिष्यभावात असल्याचे एक उदाहरण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘शिष्यभावात कसे जगतात ?’ याचे एक उदाहरण पुढे दिले आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात सनातन संस्थेची गुरुपरंपरेतील गुरूंची छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या छायाचित्राखाली ‘शिष्य डॉ. आठवले’, असा उल्लेख केला आहे.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२) 
परात्पर गुरु डॉ. आठवले

१. जीवात्मादशा

परात्पर गुरु डॉक्टर साधकांना मार्गदर्शन करतात, तसेच राष्ट्र आणि धर्म यासंबंधीचे कार्य करतात, तेव्हा त्यांची ‘जीवात्मादशा’ असते. या अवस्थेत ईश्वराशी अखंड अनुसंधानात राहून त्याला अपेक्षित कार्य परात्पर गुरु डॉक्टर करत असतात. या अवस्थेत ते ईश्वर अथवा गुरु यांविषयी ‘नम्रता, प्रेम आणि त्यांचे श्रेष्ठत्व’ जाणून कार्य करतात. हा विषय त्यांच्यातील शिष्यत्वाशी संबंधित आहे.

२. शिवात्मादशा

जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना समष्टीशी संबंधित स्थुलातून प्रत्यक्ष कार्य नसते, तेव्हा ते शिवात्मादशेत असतात. त्या वेळी त्यांची ईश्वराशी एकरूपता मोठ्या प्रमाणात असते. त्या वेळी त्यांना शिष्यत्वाची जाणीव नसते.

श्री. राम होनप

३. वरील विषयाचा सारांश

ज्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे समष्टी कार्य असते, तेव्हा ते ‘ईश्वर’ अथवा ‘गुरु’ या तत्त्वांची सेवा शिष्यभावात करतात. त्याला अनुसरून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यभावात असतात’, असे म्हटले आहे. त्या व्यतिरिक्त ते ईश्वराशी एकरूपतेची अनुभूती घेत असतात.

४. गुरु आणि शिष्य

शिष्य उत्तम साधना करून कालांतराने ‘गुरुपदी’ विराजमान होतो. त्या वेळी ‘गुरु’ आणि ‘शिष्य’ आध्यात्मिकदृष्ट्या एकरूप होतात; परंतु खरा शिष्य त्याचे ‘शिष्यत्व’ म्हणजे शिष्यात असलेले ‘गुण’ आणि ‘वृत्ती’ कधीच सोडत नाही. गुरुपण आले, तरी खरा शिष्य आयुष्यभर त्याचे ‘शिष्यत्व’ जपत असतो.

५. गुरूंशी एकरूप झालेल्या शिष्याने आयुष्यभर ‘शिष्यत्व’ जोपासल्याने होणारे लाभ

अ. शिष्यभावात राहिल्याने जिवाला सतत आनंद मिळतो.

आ. गुरुपद प्राप्त झाले, तरी त्याच्यात अहं कधीच निर्माण होत नाही.

इ. शिष्य आध्यात्मिक प्रगतीच्या शिखरावर पोचतो आणि त्याचे स्थान त्यापासून कधीच खाली येत नाही किंवा ढळत नाही.

ई. गुरूंशी एकरूप झाल्यावरही शिष्यभावात राहिलेले गुरु समष्टीसाठी नेहमी आदर्शवत् ठरतात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे त्याचेच एक उदाहरण आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.