गुरुपौर्णिमा महोत्सव २०२१ मध्ये कोची, केरळ येथील साधकांना आलेल्या अनुभूती
१. कु. रश्मी परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कोची
१ अ. श्रीमती सौदामिनी कैमल यांनी वरुणदेवतेला प्रार्थना केल्यावर पाऊस थांबणे आणि त्यानंतर पुन्हा वातावरण ढगाळ झाल्याने साधकांनी प्रार्थना करून चित्रीकरण पूर्ण करणे : ‘गुरुपौर्णिमा २०२१ च्या आधी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्या वेळी पाऊस चालू झाला. त्यामुळे श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८० वर्षे) यांनी वरुणदेवतेला प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला. एकदा सायंकाळी २ – ३ मिनिटांचे चित्रीकरण शेष होते. तेव्हा वातावरण पुन्हा ढगाळ झाले. मी आणि चित्रीकरण करणारे साधक श्री. बालकृष्ण नायका यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. आम्ही चित्रीकरण न थांबवता चालू ठेवले आणि पूर्णही केले.’
२. कु. आदिती सुखठणकर, कोची
२ अ. अचानक सर्दी झाल्यावर ‘चित्रीकरणाच्या वेळी बोलतांना अडचण येईल’, असे वाटणे; परंतु चित्रीकरणाची सेवा चालू झाल्यावर सर्दीचा त्रास न होणे : ‘गुरुपौर्णिमा २०२१ मध्ये सूत्रसंचालनाचे चित्रीकरण करायचे होते. सेवा चालू करण्यापूर्वी मला अकस्मात् सर्दी झाली. त्यामुळे मला त्रासही होत होता. आरंभी ‘या स्थितीत माझे चित्रीकरण कसे होईल ? बोलतांना अडचण येईल आणि ती माझ्या तोंडवळ्यावर दिसेल’, असे मला वाटत होते; पण नंतर माझ्या मनात एकच विचार होता, ‘मला आजच ही सेवा पूर्ण करायची आहे.’ चित्रीकरणाची सेवा चालू झाल्यावर मला सर्दीचा त्रास झाला नाही.
२ आ. प्रत्येक सेवेत सहसाधकांचे साहाय्य मिळत असल्यामुळेच सेवा पूर्ण होणे आणि वाईट शक्तींचे अडथळे यायला नको; म्हणून संतांनी आधीच नामजपादी उपाय सांगणे : काही प्रसंगांत मला साधकांविषयी कृतज्ञता वाटत होती; कारण मला प्रत्येक सेवेत सहसाधकांचे साहाय्य मिळत असल्यामुळेच माझ्या सेवा पूर्ण होऊ शकल्या. मला माझ्या सेवेत वाईट शक्तींचे अडथळे यायला नको; म्हणून संतांनी आधीच मला नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्यामुळे या वर्षी माझ्या सेवेत अत्यल्प अडचणी आल्या. ‘साधकांसाठी संत आणि गुरुदेव किती करतात !’, याची मला प्रचीती येत होती.’
३. श्री. नंदकुमार कैमल, कोची
३ अ. गुरुपौर्णिमा कार्यक्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी संकल्प केल्यावर संपूर्ण शरिराभोवती चैतन्याचे कवच सिद्ध होणे : ‘२३.७.२०२१ या दिवशी सकाळी साधकांसाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रम चालू होता. त्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपूजन करत होत्या. त्यांनी संकल्प केल्यावर माझ्या संपूर्ण शरिराभोवती चैतन्याचे कवच सिद्ध झाले. तेव्हा मला माझ्या डोळ्यांसमोर येणाऱ्या भावी आपत्काळाचे दृश्य दिसू लागले. तेव्हा ‘चैतन्यामुळे माझे रक्षण होत आहे’, असे मला दिसू लागले. त्या वेळी माझे मन प्रार्थनेवर एकाग्र झाले.’
४. सौ. बिनुषा सजीश, केरळ
अ. ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी गुरुचरणांकडे पाहिल्यावर ‘माझ्या आज्ञाचक्रामध्ये पुष्कळ शक्ती येत आहे’, असे मला जाणवले आणि माझी पुष्कळ भावजागृती होत होती.’
५. सौ. नीना उदयकुमार, एर्नाकुलम्
अ. ‘मी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पहातांना आमच्या घरी चंदनाचा सुगंध येत होता. मला पुष्कळ आनंद वाटत होता.’
(‘सौ. नीना उदयकुमार या मागील एक वर्षापासून ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’च्या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडलेल्या आहेत.’ – संकलक)
६. श्री. साईदीपक, थिरूवनंतपुरम्
६ अ. गुरुचरणी प्रार्थना करतांना ‘काय अर्पण करू ?’, असा विचार केल्यावर सूक्ष्मातून गुरुदेवांनी मन आणि बुद्धी अर्पण करण्यास सांगणे अन् नंतर मन शांत होणे : ‘मी गुरुचरणी प्रार्थना करतांना ‘काय अर्पण करू ?’, असा विचार करत होतो. तेव्हा सूक्ष्मातून गुरुदेव मला ‘तुझे मन आणि बुद्धी अर्पण कर’, असे सांगत होते. तो विचार आल्यावर माझे मन शांत झाले आणि मी ‘देवच माझ्याकडून सर्व करवून घेतो’, असा विचार केला. त्यानंतर मला सर्व परिस्थिती शांतपणे स्वीकारता आली.
६ आ. गुरुपौर्णिमेच्या आधी भ्रमणसंगणकाचा ‘चार्जर’ बंद पडणे आणि ही अडचण आल्यावर ‘गुरुदेव भ्रमणसंगणकावर तीर्थ शिंपडत आहेत’, असे दिसणे अन् ‘चार्जर’ला कोणतीही अडचण न येणे : गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी माझ्या भ्रमणसंगणकाचा (लॅपटॉपचा) ‘चार्जर’ खराब झाला. त्यामुळे मी नवीन ‘चार्जर’ घेतला. तोसुद्धा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी काही घंटे बंद पडला. मी गुरुचरणी शरण गेलो. तेव्हा गुरुदेवांनी ‘ही अडचण वाईट शक्तीमुळे आहे’, असे सांगून ‘ते सूक्ष्मातून माझ्या भ्रमणसंगणकावर तीर्थ शिंपडत आहेत’, असे मला दिसले. नंतर माझ्या ‘चार्जर’ला कोणतीही अडचण आली नाही.
मी बसून सेवा करत होतो. तेव्हा ‘माझ्याकडून देव सर्व सेवा करवून घेत आहे. मी काहीही करत नाही’, असे माझ्या लक्षात आले.
(सर्व सूत्रांचा दिनांक २५.७.२०२१)
|