सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

२.७.२०२२ या दिवशीच्या भागात ‘पू. (कु.) रत्नमाला दळवी यांच्यामध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कसे पालट झाले ?’, ते पाहिले. आजच्या भागात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये व्यष्टी ते समष्टी असे झालेले पालट पहाणार आहोत.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःमधील कर्तेपणाची जाणीव होऊन ‘मिळालेली प्रत्येक सेवा स्वीकारायची’, असा मनाचा निश्चय होणे

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘एका सेवेचे दायित्व तुला घ्यायचे आहे. याविषयी विचार करून मला सांग.’’ माझ्याकडील सेवांचा विचार करून मी त्यांना सांगितले, ‘‘मला ही सेवा जमणार नाही.’’ माझे वाक्य पूर्ण होताच त्या मला म्हणाल्या, ‘‘तू सेवा करणार असशील, तर तुला कोणतीच सेवा जमणार नाही; पण तुझ्या माध्यमातून देव सेवा करणार असेल, तर तू कोणतीही सेवा करू शकतेस. तुझी क्षमता आहे. तुझ्यात अभ्यास करण्याची क्षमता आहे. तू केवळ प्रयत्न वाढव.’’ त्यांच्या या वाक्याने मला माझ्यातील कर्तेपणा, माझी चूक आणि माझ्यातील संकुचितपणा याची जाणीव झाली. त्यानंतर केवळ त्यांच्या कृपेनेच ‘इथून पुढे कोणत्याही सेवेला नकार द्यायचा नाही’, असा पक्का निर्धार झाला आणि माझ्या मनात कधीच ‘मला सेवा जमणार नाही’, असा विचार आला नाही. यातून ‘संतांच्या एखाद्या वाक्यानेही मनातील अयोग्य विचार कसे नष्ट होतात ?’, हे मी अनुभवले. त्यानंतर कोणतीही सेवा करतांना ‘ती माझीच सेवा आहे’, या विचाराने करता येऊ लागली. या प्रसंगानंतर माझी समष्टी सेवेची तळमळ वाढायला आरंभ झाला.

८. आध्यात्मिक प्रगतीविषयी झालेली विचारप्रक्रिया

८ अ. आध्यात्मिक पातळीचा विचार मनात न येता, ‘सेवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडली असेल का ?’, असा विचार येणे : ‘मी साधनेत दायित्व घेऊन सेवा करायला लागल्यापासून ‘सेवा अधिकाधिक कशी करता येईल ? सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढेल ? सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी काय प्रयत्न करू शकते ?’, यांसाठीचे प्रयत्न अधिक होऊ लागले. ‘सेवा करतांना परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे प्रयत्न करायचे आहेत’, असा विचार अधिक असतो. ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, यापेक्षा ‘मी केलेली सेवा गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आवडली असेल का ? सेवा पाहून ते काय म्हणतील ?’, अशी माझी विचारप्रक्रिया अधिक असते.

८ आ. आध्यात्मिक पातळी न वाढल्यावर ‘स्वतः कुठे न्यून पडत आहे ? कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ?’, याचे चिंतन होणे : गुरुपौर्णिमा २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत माझी आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली होती. या कालावधीत अनेक साधक मला आध्यात्मिक प्रगतीविषयी विचारत असत. तेव्हा मी मनात म्हणायचे, ‘गुरुदेव, मला आध्यात्मिक पातळीत अडकायचे नाही. मला तुम्हाला अपेक्षित अशा हिंदु राष्ट्रासाठी घडायचे आहे.’ साधकांनी मला पातळीविषयी विचारल्यावर मला वाईट न वाटता माझ्याकडून ‘मी कुठे न्यून पडत आहे ? मी नेहमी कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ?’, याचे चिंतन होत असे.

९. साधनेच्या प्रवासात स्वतःमध्ये जाणवलेले पालट 

९ अ. आवड-नावड न्यून होणे : पूर्णवेळ साधना करायला लागण्याआधी माझ्या आवडी-नावडी पुष्कळ होत्या. आश्रमात रहायला गेल्यानंतर माझ्या आवडी-नावडी न्यून होऊ लागल्या.

९ आ. कधी कुठेही एकटीने प्रवास केलेला नसतांना सेवेसाठी एकटीने सहजतेने प्रवास करू शकणे : मी कधीच एकटीने प्रवास केला नव्हता. ‘रेल्वेने प्रवास कसा करायचा ?’ हेही मला ठाऊक नव्हते. मी साधनेत आल्यावर माझ्याकडे सेवेचे दायित्व आले. त्यानंतर मला सनातनच्या पनवेल, मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील आश्रमांत, तसेच मंगळुरू आणि काही जिल्ह्यांतही सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने एकटीने प्रवास करतांना मला कधीही भीती वाटली नाही किंवा कुठली अडचणही आली नाही. ‘मी एकटीने प्रवास करत आहे’, असे मनाला कधी जाणवायचेही नाही. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच मला अनुभवता आले.

९ आ १. प्रवासात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आवश्यक तिथे साहाय्य करत आहेत’, असे अनुभवता येणे : एकदा मी मंगळुरू ते पनवेल असा प्रवास प्रथमच रेल्वेने करत होते. समवेत असलेले अन्य प्रवासी कन्नड भाषिक होते. प्रवासात तिकीट तपासनिसाने (टी.सी.ने) मला काहीतरी विचारले; पण मला कन्नड भाषा येत नसल्याने मला ते कळले नाही. त्यामुळे मी केवळ ‘मुंबई’ एवढेच सांगितले. त्यानंतर संपूर्ण प्रवासात त्याने मला पुन्हा काही विचारले नाही. तेव्हाही मला कसली भीती वाटली नाही. ‘आवश्यक तो एक शब्दही गुरुदेवांनीच माझ्याकडून बोलून घेतला’, असे माझ्या लक्षात आले.

९ इ. नियोजनकौशल्य शिकता येणे : साधनेत येण्यापूर्वी मी कधीच कसलेही नियोजन केले नव्हते. साधनेत आल्यावर सेवांचे दायित्व येत गेले, तसे नियोजनकौशल्य वाढत गेले. पूर्वी एखाद्या सेवेचे नियोजन करतांना माझ्याकडून ‘सेवेचा आरंभ कधीपासून करायचा आणि त्यासाठीची पूर्वसिद्धता’ या गोष्टी पाहिल्या जायच्या. काही दिवसांनी ‘एखादी सेवा कधी चालू करायची ? त्यासाठी किती साधक उपलब्ध आहेत ?’, हे पाहून ती सेवा कधी पूर्ण होऊ शकेल ?’, याचा विचार करून नियोजन करणे जमू लागले. काही दिवसांनी मला प्रत्येक सेवेचे नियोजन अशा प्रकारे करता येऊ लागले. देवाच्या कृपेने केलेल्या नियोजनामध्ये कधी अडचण आली, तरी ती सेवा त्या वेळेतच पूर्ण होते’, असेही अनुभवता आले. गुरुकृपेने हे आत्मसात करता येत आहे.

९ ई. नियोजनातील पालट स्थिर राहून स्वीकारता येणे

१. एखाद्या साधकाला सेवा सांगितल्यानंतर त्याला काही अडचण आली किंवा अन्य काही कारणाने त्याच्यामध्ये पालट झाला, तर ताण न येता त्यावर उपाययोजना काढून ती सेवा पूर्ण करता येते.

२. काही वेळा तातडीने सेवेसाठी दुसऱ्या आश्रमात जावे लागते. अशा वेळीही ताण न येता अल्प वेळेत सर्व सिद्धता करायला जमू लागली आहे.

यातून ‘देवाने सर्व नियोजन आधीच केलेले असते. आपण केवळ सकारात्मक राहिलो, तर सर्व आपोआपच होते’, असे मला शिकायला मिळाले.

९ उ. स्वतःचा शारीरिक त्रास न स्वीकारता, तशाच स्थितीत सेवा करत रहाणे : काही वर्षांपूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर माझी परात्पर गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) भेट होत असे. तेव्हा ते माझ्या प्रकृतीची विचारपूस करायचे आणि सांगायचे, ‘‘अजून पुष्कळ सेवा करायची आहे. प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे.’’ तेव्हा मला ‘प्रकृतीकडे लक्ष द्यायचे म्हणजे काय ?’, हेच कळत नसे. आता मला मान आणि हात यांत वेदना होत असल्यामुळे शारीरिक सेवा करणे जमत नाही. माझ्या वेदनांचे प्रमाण वाढल्यावर सहसाधक मला विश्रांती घ्यायला सांगत असत; परंतु माझ्यातील अहंमुळे माझ्याकडून ते स्वीकारले जायचे नाही. त्याही स्थितीत मी सेवा करत रहायचे. त्यामुळे माझी पुष्कळ चिडचिड होत असे. आता माझा स्वतःच्या दुखण्याकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट होऊ लागला आहे.

९ उ १. शारीरिक स्थिती स्वीकारून विश्रांती घेतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवेसंबंधीची काही सूत्रे सुचवत आहेत’, असे जाणवणे : आता मी आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करत आहे. ‘मला होत असलेला त्रास म्हणजे माझ्या मागील जन्मींचे प्रारब्ध आहे’, हे लक्षात घेऊन मला तो त्रास पूर्णपणे स्वीकारता येत आहे. आता मी आवश्यक तेवढी विश्रांती घेते. ‘विश्रांती घेत असतांना मी कोणती सेवा करू शकते ?’, याचा विचार करून तसा प्रयत्न करते. विश्रांतीच्या वेळेत अधिकाधिक व्यष्टी साधनेचे प्रयत्न करते. असे प्रयत्न केल्याने आता त्रासाविषयी मला काही वाटत नाही. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच माझ्यामध्ये हे पालट झाले. बऱ्याचदा विश्रांती घेत असतांना ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवेतील काही सूत्रे सुचवत आहेत’, असेही आता अनुभवता येते.

९ उ २. उजवा हात दुखण्याचे प्रमाण वाढल्यावर देवाने डावा हात वापरण्याचा विचार देणे आणि त्याचा पुष्कळ लाभ होणे : हळूहळू माझे उजव्या हाताचे दुखणे वाढले. मला उजव्या हाताने ‘माऊस’ वापरणे अशक्य झाले. आधुनिक वैद्यांनी मला एक मास पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली; पण ज्या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली, त्याच दिवशी एका संतांनी मला सेवेतील काही अक्षम्य चुकांची जाणीव करून देऊन त्या सुधारण्याचा निरोप पाठवला. ‘संतांनी म्हणजे श्री गुरूंनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) सांगितले आहे’, असा विचार होऊन ती सेवा करायलाच हवी’, या विचारात असतांनाच श्री गुरूंनीच मला डाव्या हाताने ‘माऊस’ वापरण्याचा विचार दिला. त्या दिवसापासून मी उजवा हात दुखू लागल्यावर डाव्या हाताने ‘माऊस’ वापरण्यास आरंभ केला. त्यामुळे गुरुकृपेने सेवेतील एक अडचण दूर झाली. मला त्याचा अजूनही लाभ होत आहे.  (क्रमशः)

– (पू.) कु. रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२२)