अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा युतीचीच सत्ता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – शरद पवार जे म्हणतात, नेहमी त्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांनी सरकार पडेल म्हटले, म्हणजे आमचे शासन अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ४ जुलै या दिवशी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आमचे शासन येणार म्हणून महाविकास आघाडीने घाई गडबडीत जे शासन आदेश काढले, ते पडताळून आवश्यकतेनुसार पालट करण्यात येईल. चिपळूण येथील पूरस्थितीविषयी संबंधित सर्व यंत्रणांची २ दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी शासकीय यंत्रणा दक्ष आहे.’’
विधानसभेच्या अध्यक्षांचा पुन्हा घेण्यात आला विश्वासदर्शक ठराव !
३ जुलै या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक शिवसेना आणि भाजप यांनी जिंकली; मात्र त्यानंतर महाविकास आघाडीकडून सभागृहात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आला. त्यामुळे ४ जुलै या दिवशी पुन्हा शिवसेना-भाजप युतीकडून विधानसभेत अध्यक्षांच्या नियुक्तीविषयी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला, अशी माहिती या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने या दिवशी असलेले विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन त्या दिवशी चालू करायचे कि नाही ? याविषयीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.