आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवू ! – गुलाबराव पाटील, आमदार
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – शिवसेनेतील आमदारांनी बंड नाही, तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमची चिंता नको. आमचा निर्णय शिवसैनिकांना मान्य आहे. भगवा हातात घेऊन आम्ही येथपर्यंत पोचलो आहोत. आम्हाला मंत्री केले, हे उपकार आहेत. आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर देतांना केले. विधानसभेत ४ जुलै या दिवशी एकनाथ शिंदे-भाजप गटाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की,
१. आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यामुळे निवडणुका अयशस्वी होण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात, ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही.
२. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा यांना दु:ख देण्याची आमची इच्छा नाही.
३. हिंदुत्वाचे संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. वर्ष १९९० मध्ये शिवसेनेने प्रथम भाजपसमवेत युती केली. मी १७ वर्षांचा असतांना शिवसेनेत काम चालू केले. ‘आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल’, असे वाटलेही नव्हते. जे मिळाले, ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाले.
४. शिवसेना रसातळाला जात असतांना तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल, तर ती वाचवण्याचे दायित्व आमचे आहे.
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले, त्याविषयी मी त्यांचा आभारी आहे.