शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभु यांची नियुक्ती रहित !
मुंबई – विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांची नियुक्ती रहित केल्याचे पत्र ३ जुलैच्या रात्री उशिरा काढले. पत्रामध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, तर भरत गोगावले हे प्रतोद असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुमत चाचणीपूर्वी हिंगोली येथील शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात भरती झाले.
बहुमतासाठी शिंदे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना ‘व्हीप’ बजावला !
दुसरीकडे शिवसेनेच्या १६ आमदारांना शिंदे गटाकडून ‘व्हीप’ बजावण्यात आला आहे. ‘व्हीप’ न पाळल्यास आमदारकी रहित करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभु यांनी सर्व आमदारांना ‘व्हीप’ बजावला आहे.
‘व्हीप’ म्हणजे काय ?एखाद्या पक्षाने कोणत्या सूत्रावर सभागृहामध्ये भूमिका घ्यायची, याविषयी घेतलेला निर्णय म्हणजेच ‘व्हीप’ होय. हा ‘व्हीप’ राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदानासाठी संबंधित पक्षाने कुणाला मतदान करायचे ? याचा निर्णय घ्यायचा असेल, तर याविषयी पक्षादेश ‘व्हीप’द्वारे लागू करण्यात येतो. |