धरण म्हणजे नदीसह शेकडो प्रजातींचे मरण आणि महापुराला आमंत्रण !
१. धरणांमुळे निर्माण झालेली धोक्याची उपरती
नदी समुद्राला मिळते, तेव्हा तिचे पाणी वाया जाते, असे म्हणत देशभरात धरणे उभी राहिली. धरणे पुरेशी नव्हती; म्हणून आता नदीजोड प्रकल्पाचा हव्यास धरला गेला; पण ‘धरण म्हणजे नदीचे मरण’, हे अजूनही लोकांना समजत नाही, हे दुर्दैव आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अतीवृष्टीच्या घटना सर्वत्र घडू लागल्या आहेत. अशातच धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास काय हाहाःकार होऊ शकतो, हे महाराष्ट्राने कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पाहिले आहे. अशा वेळी धरणात पाणी अधिक काळ तोलून ठेवता येत नाही आणि नाईलाजाने ते बाहेर सोडून द्यावे लागते.
जागतिक तापमानवाढीच्या अनुषंगाने जगभरात धरणांचा धोका लक्षात घेऊन जेथून धरणे बांधणे चालू झाले, त्या युरोपातूनच नद्या धरणमुक्त करण्याची मोहीम चालू झाली आहे. सगळा विध्वंस केल्यानंतर युरोपीय लोकांना सुबुद्धी सुचली. त्यामुळे हे घडत आहे.
२. महापुरासाठी ‘उत्प्रेरक’ (चालना देणारी) ठरणारी धरणे
महापुरात धरणे ही ‘उत्प्रेरक’ म्हणून काम करतात, हे ओळखून युरोपात धरणे फोडून धरण परिसरातील जंगल आणि नैसर्गिक परिसंस्था पुन्हा प्रस्थापित केल्या जात आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण जेव्हा नदी वहाती असते, तेव्हा ती डोंगरातील गाळ वाहून आणून सुपीक भूमी बनवते. अशा भूमीवर उत्कृष्ट शेती होते, जंगल वाढते. अतीवृष्टी झाली, तरी जंगले एखाद्या ‘स्पंज’प्रमाणे हे पाणी सामावून घेतात.
गंगा जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर आली, तेव्हा तिच्या प्रचंड प्रवाहामुळे विनाश ओढवू नये; म्हणून शंकराने स्वतःच्या जटांमध्ये तिला धारण केले. पर्वतांवरील जंगले हीसुद्धा शंकराच्या जटांप्रमाणे कार्य करतात; म्हणून कदाचित् पर्वतरांगांना ‘गिरिराज’ असे संबोधले जाते.
३. सजिवांची संजीवनी म्हणून कार्य करणारी नदी !
नदी जंगल वाढवते आणि जंगल नदीला भूमी साठवण्यास साहाय्य करते. परिणामी भूजल पातळीत वाढ होते, तसेच कित्येक सजिवांची साखळी नदीच्या प्रवाहामुळे चालू रहाते. पालघर जिल्ह्यात सूर्या नदीवर धरण नव्हते, तेव्हा पावसाळ्याच्या वेळी पोचा कोळंबी (गोड्या पाण्यातील कोळंबी) प्रजननासाठी नदीतून खाडी क्षेत्रात प्रवास करायची आणि तेथे असंख्य पिल्लांची पैदास व्हायची. त्या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून हे बीज पकडून ते महाराष्ट्रभर कोळंबी प्रकल्पांना विकले जायचे. पुढे सूर्या नदीवर धरण आले. त्यामुळे कोळंबीचे नदीतून खाडीकडे जाणे बंद झाले. परिणामी आज पालघर जिल्ह्यात गोड्या पाण्यातील कोळंबीचे बीज मिळणे बंद झाले. अशीच काहीशी अवस्था कित्येक सागरी जिवांची होत आहे.
४. नदीवरील धरण म्हणजे शेकडो प्रजातींचे मरण
नदी समुद्राला मिळते, तेव्हा तिचे पाणी कधीच वाया जात नाही, उलट ती जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा तिचे पाणी सागरी जिवांसाठी अमृताचे काम करते. नदी शेकडो किलोमीटर वाहून आणलेला गाळ खाडीच्या ठिकाणी समुद्राला देते, त्यांमुळे किनारी भागात वनस्पती प्लावकांची (नदीच्या प्रवाहाच्या गतीसह वहात येणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचा समूह) भरमार (वाढ) होते. हे सागरी प्लावक कित्येक माशांच्या पिल्लांसाठी प्रमुख अन्न म्हणून काम करते. यासाठी खोल समुद्रात रहाणारे मासेही त्यांच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी खोल समुद्रातून किनारपट्टीजवळ प्रवास करतात. त्याचप्रमाणे कित्येक सागरी जीव, उदा. कांदळवन आदी ठिकाणी आढळणाऱ्या खेकड्यांच्या माद्या अंडी देण्यासाठी किनारपट्टीवरून खोल समुद्रात १०० कि.मी.पर्यंत शुद्ध खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी त्यांची लाखो अंडी सोडतात आणि त्यानंतर त्यांची पिल्ले एकूण ५ अवस्थांतून जातात. शेवटच्या अवस्थेत असतांना ते नदी जेथे खाडी बनवते, अश्या निमखाऱ्या पाण्याजवळ प्रवास करतात. तेथे शेवटची कात टाकून ते मूळ खेकड्याच्या रूपात येतात. अशा रितीने नदी तिच्या उगमापासून ते समुद्र संगमापर्यंत जिथे जाईल, तिथे जीवन देत जाते. तिच्यावर बांधलेले धरण म्हणजे तिच्यावर अवलंबून असलेल्या शेकडो प्रजातींचे मरण असते.
५. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून उभ्या राहिलेल्या धरणांमुळे होणारी हानी
नदीचे पाणी समुद्रात कधीच वाया जात नसते. आपण नसते उद्योग करण्यासाठी ‘ते वाया जाते’, असा सोयीस्कर प्रचार करतो. जागतिक तापमानवाढ होत असतांना आपण नद्यांच्या सोबत अगदी विचित्र वागत आहोत. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पाणथळ जागा, तलाव, झरे बुजवून टाकत आहोत. याची विशेष सोय पाणथळ भूमी कायद्यात घातक पालट करून, पाणथळ भूमीचे संरक्षण काढून घेऊन केली आहे. त्या ठिकाणी भराव टाकले जात आहेत आणि त्यावर मोठमोठी निवासी संकुले उभी रहात आहेत. एवढ्यावर भागले नव्हते; म्हणून नदीसाठी आवश्यक असलेले ‘आर्.झेड.’ (रेग्युलेशन झोन) म्हणजेच नदी प्रभाव क्षेत्र रहित केले, म्हणजेच नदीच्या दोन्ही बाजूला असलेला ‘बफर झोन’ रहित करून तिथे ‘रिव्हर फ्रंट’ प्रकल्पांद्वारे नदीचे प्रवाह अडवणारे बांधकाम करून तिथे मोठमोठी निवासी संकुले उभी राहिली आहेत. परिणामी ‘रिव्हर व्ह्यू’ (नदीचे दृश्य) नाव असलेली अशी निवासी संकुले अतीवृष्टीमुळे ‘इनसाईड रिव्हर’ (जलमय) होत आहेत. एवढ्यावर भागले, तर नशीब; पण याही पुढे अतीवृष्टीमुळे येणारे महापूर रोखता यावेत; म्हणून नद्यांच्या भोवती संरक्षक भिंती बांधून नदीला जखडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार होते. आता तरी शहाणे होणे आवश्यक आहे. ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे.
‘आय.आय.टी.’चे डॉ. जी.डी. अग्रवाल यांनी गंगा नदीवर धरण नको; म्हणून अन्नत्याग करत देहत्याग केला. त्यांचे बलीदान वाया जाऊ नये. नदी जीवनदायी आहे; पण तिच्यावर अत्याचार केले, तर ती जीवन हिरावूनही घेते. यात दोष नदीचा नसून आपलाच आहे, हे लक्षात घेऊन आता तरी शहाणे होऊया.
लेखक : प्रा. भूषण भोईर, सहप्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर.