परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेला साधकांना समर्थ रामदासस्वामी यांच्या दोन सुवचनांतून आश्वस्त करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य असणाऱ्या डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगणे आणि ती सुवचने साधकांना ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या कार्यासाठी बळ देणारी असणे

वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगितली होती. एकदा अकस्मात् मला ही दोन्ही सुवचने आठवली. ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या कार्यासाठी ही दोन्ही सुवचने साधकांना बळ देतील’, असे मला वाटले. मी ती सुवचने सांगून साधकांना म्हणालो, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या अलौकिक कार्यात आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात; पण साधकांनी कुठल्याही प्रकारची चिंता किंवा काळजी न करता अशा कठीण परिस्थितीला भेदून ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या जागृतीची चळवळ करायची आहे. यासाठी ही सुवचने नेहमी स्मरणात ठेवावी.’’

२. सुवचने आणि त्यांचा अर्थ

२ अ. सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।। – दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.

२ आ. समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।। ३० ।। – मनाचे श्लोक

अर्थ : समर्थ अशा भगवंताच्या सेवकाकडे वक्र दृष्टीने पहाणारा या भूमंडळी कोण आहे ? ज्याची लीला तिन्ही लोकांमध्ये वर्णन केली जाते, अशा श्रीरामाचा दास कधीच उपेक्षिला जात नाही.

२ इ. ‘साधक हे सर्वसमर्थ असणाऱ्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भक्त असल्याने त्यांच्याकडे कुणी वक्र दृष्टीने पाहू शकणार नसणे; पण त्यासाठी साधकांनी प्रतिदिन करायची साधना पूर्ण करणे आवश्यक असणे’, असा या दोन्ही सुवचनांचा अर्थ असणे : याचा अर्थ ‘बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या अलौकिक कार्यात तळमळीने सेवा करणाऱ्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडस कुणामध्येही नाही’, हे प्रत्येक साधकाने स्मरणात ठेवावे. आपण हिंदूंच्या जागृतीची चळवळ करत आहोत. त्याला यश येण्यासाठी आपण आपली व्यष्टी साधना अत्यंत गांभीर्याने आणि प्रत्येक दिवशी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, हे साधकांनी नेहमी लक्षात ठेवावे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या सुवचनांद्वारे आश्वस्त केल्यामुळे साधकांनी ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीच्या कार्यात आत्मविश्वासाने आणि झोकून देऊन सेवा करणे आवश्यक असणे

सध्या आपत्काळ चालू झाला आहे. हळूहळू युद्धकाळ चालू होणार आहे. आपण सेवा करतांना वरील दोन सुवचनांचे नुसते स्मरण केले, तरी आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन आपले सेवेचे बळही वाढणार आहे. त्यामुळे साधकांनी ‘न भूतो न भविष्यति’ अशा अलौकिक ‘हिंदु राष्ट्र्र स्थापने’च्या कार्यात आपल्या मनाचा निर्धार करून झोकून देऊन आणि आत्मविश्वासाने सेवा केली पाहिजे. वरील दोन सुवचनांद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना आश्वस्त केले आहे. आता साधकांचे ‘हिंदु राष्ट्र’ हे एकच ध्येय असले पाहिजे.

– श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र. (२०.२.२०२२)

आपत्काळात श्री गुरूंचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व !

मी ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथातील ‘गुरूंचे ऐकण्याचे महत्त्व’ याविषयी वाचत असतांना देवाने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आणून दिली.

१. समाजात कुणी कुणाचे ऐकत नसणे आणि समाज साधनाही करत नसल्यामुळे देश रसातळाला पोचणे

श्री. निरंजन चोडणकर

‘साधक ते शिष्य’ असा प्रवास होण्यासाठी साधकाने श्री गुरूंचे आज्ञापालन केले पाहिजे. सध्या समाजात कुणीही ऐकण्याच्या स्थितीत नसते. ‘मी सांगतो, ते इतरांनी ऐकले पाहिजे’, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांची तीव्रता वाढून समाज दुःखी झाला आहे. समाजातील लोकांची ऐकण्याची स्थिती मुळीच नसल्यामुळे त्यांना साधना शिकवणे फार कठीण जाते; पण या घातक वृत्तीमुळे आज देश रसातळाला पोचला आहे.

२. साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने केली, तरच ते उत्तरदायी साधकांचे ऐकू शकणे

‘कठीण परिस्थितीत साधकांनी श्री गुरूंचे आज्ञापालन केले पाहिजे. साधना करतांना बऱ्याच वेळा सहसाधक आपल्याला काहीतरी सांगत असतो; पण आपण ते ऐकून घेण्याच्या स्थितीत नसतो; कारण आपल्या मनात ‘देवच माझ्या भल्यासाठी सहसाधकाच्या माध्यमातून सांगत आहे’, असा विचार नसतो. आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने केली, तरच आपण साधकांचे ऐकू शकतो आणि त्याचा लाभ आपल्याला साधनेत प्रगती होण्यासाठी होऊ शकतो.

३. थोड्याच दिवसांत युद्धकाळ चालू होणार असून अशा कठीण काळात व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अनुषंगाने उत्तरदायी साधकांचे ऐकणे आवश्यक असणे

‘आपत्काळ किंवा युद्धकाळ यांमध्ये काय होणार ?’, याचे ज्ञान आपल्यापैकी कुणालाही नाही. या कठीण परिस्थितीमध्ये आपले आचरण कसे असले पाहिजे ? युद्धकाळामध्ये आपण ‘श्री गुरु सांगतील, ते शंभर टक्के ऐकले पाहिजे’ आणि हीच आपली सध्याची सर्वश्रेष्ठ साधना आहे. या आपत्काळात आपल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अनुषंगाने आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत, ते आपले उत्तरदायी साधक आपल्याला सांगणार आहेत. ते आपण ऐकले पाहिजेत आणि त्या अनुरूप आपल्याला कृती करता आली पाहिजे. ‘गुरुतत्त्व हे प्रत्येक साधकाच्या माध्यमातून कार्यरत असते’, हेही आपल्याला अनुभवता आले पाहिजे.

‘मला वेळोवेळी श्री गुरूंची कृपा अनुभवता आली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.  (२०.२.२०२२)