मानेसर (हरियाणा) येथील पंचायतीकडून मुसलमान व्यापार्यांवर आर्थिक बहिष्कार घोषित !
गुरुग्राम (हरियाणा) – गुरुग्रामजवळ असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. ३ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या या पंचायतीने प्रशासनाला समयमर्यादा देऊन चेतावणी दिली आहे की, त्यांनी जवळपासच्या सर्व गावांमध्ये अशा स्वरूपाचा आर्थिक बहिष्कार लागू करण्यासाठी गावाच्या स्तरावर समित्या नेमाव्यात. जर प्रशासनाने कारवाई केली नाही, तर मोठी पंचायत बोलावून पुढे काय कारवाई करायची, ते हिंदूच ठरवतील, अशी चेतावणीही हिंदूंनी दिली.
१. सदर पंचायतीत बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांचे सदस्य यांच्यासमवेत २०० हून अधिक लोकांनी भाग घेतला. यामध्ये मानेसरसमवेत धारूहेडा, तसेच गुरुग्रामजवळ असलेल्या सर्व गावांतील लोक सहभागी झाले होते.
२. या वेळी पंचायतच्या सदस्यांनी प्रशासनाला मागणीचे निवेदनही सुपुर्द केले.
३. विहिंपच्या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले की, धार्मिक कट्टरतावाद आणि जिहादी शक्ती यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी क्षेत्रातील सर्व हिंदूंनी पंचायतीचे आयोजन केले होते.
४. अन्य वक्त्यांनी म्हटले की, मानेसर गावात मुसलमान हे हिंदूंच्या देवतांच्या नावाने दुकाने उघडतात. हे हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्र असून मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालायला हवा.
मुसलमान घुसखोरांवर तात्काळ कारवाईची हिंदूंची मागणी !‘जवळपासच्या सर्वच गावांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांनी अवैध दुकाने थाटली आहेत. ते हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कृत्यांमध्ये सहभागी होत असतात. त्यांचे अन्वेषण करून त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे’, असे हिंदूंनी प्रशासनाकडे सुपुर्द केलेल्या निवेदनात म्हटले होते. |