सूरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार !
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर,३ जुलै (वार्ता.) – सूरत-चेन्नई महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. ५ जून २०२२ पासून भूमी मोजणीचे काम चालू करण्यात आले होते. हे काम समुहाने गतीने केल्याने अंतिम टप्प्यात असून ११ जुलैपर्यंत पूर्ण गावांतील ‘रोव्हर’ (भूमी मोजण्याचे यंत्र) द्वारे मोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सूरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणीविषयीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते.
बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या अधिकारी अरूणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, तर वन आणि सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
१२ घंट्यांचे अंतर न्यून होणार !सूरत-चेन्नई हे अंतर १ सहस्र २९० किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी ३० घंटे लागत होते. या महामार्गामुळे आता १८ घंट्यांत हे अंतर पार करता येणार आहे. ८ सहस्र २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. |