(म्हणे) ‘औरंगजेबाचे नाव हटवून भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे !’
औरंगाबादच्या नामांतरावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची धमकी !
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – ‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करून शासनाने काय साध्य केले ? नाव पालटल्याने कुठला विकास होणार आहे कि कुठली रोजगारनिर्मिती होणार आहे ? मुसलमानांचे नाव हटवून कोणता संदेश दिला जात आहे ? हिंदु आणि मुसलमान यांच्यात प्रेमाचे नाते आहे. हे नाते तुटले, तर देश तुटेल. औरंगजेबाचे नाव हटवून भारताला सर्वनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे, असे धमकीवजा हिंदुद्वेषी विखारी फुत्कार समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काढले. (‘भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर नेले’, या वाक्यातून अबू आझमी कोणता संदेश देत आहेत ? – संपादक)
३ जुलै या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अभिनंदन करण्यासाठी बोलायला उभे राहिलेल्या अबू आझमी यांनी अभिनंदनपर बोलायचे सोडून ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी आझमी यांना अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्याची जाणीव करून दिली; मात्र त्यानंतर आझमी यांनी सभागृहात हिंदुद्वेषी वल्गना केल्या. या वेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्या बोलण्यावर हरकत नोंदवत त्यांच्या बोलण्याला विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आझमी यांच्या बोलण्याविषयी मतप्रदर्शन करतांना ‘सदस्यांना बोलू द्यावे. काही विरोध असल्यास त्यांचे बोलणे संपल्यावर त्याविषयी स्वत:चे म्हणणे मांडू शकतो’, अशी भूमिका मांडली.
औरंगजेब हा आतंकवादीच ! – भास्कर जाधव, शिवसेना
औरंगजेबाने २७ वर्षे महाराष्ट्रातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. औरंगजेबाच्या नावाला विरोध, म्हणजे मुसलमानांना विरोध नव्हे. औरंगजेब हा आतंकवादीच होता.
संभाजी महाराजांना ठार मारणार्या औरंगजेबाचे नाव शहराला देणार का ? – हरिभाऊ बागडे, नेते, भाजप
संभाजीनगर या आमच्या भावना आहेत. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारले. त्यांच्या देहाचे तुकडे केले. त्याचे नाव आपण शहराला देणार का ?
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने शिवसेना आणि भाजप यांचे आझमी यांना प्रत्युत्तर !
अबू आझमी यांनी ‘संभाजीनगर’ या नावाला विरोध केल्यावर सभागृहात शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी ‘धर्मवीर संभाजी महाराज यांचा विजय असो ।’ अशी घोषणा देऊन अबू आझमी यांना प्रत्युत्तर दिले.
संपादकीय भूमिका
|