आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन २४ घंटे चालू !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी वारीच्या निमित्ताने १ जुलैपासून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ घंटे चालू ठेवण्यात आले आहे. १० जुलै या दिवशी आषाढी वारी असून यानिमित्त पायी पालखी सोहळ्यासमवेत राज्यातील आणि परराज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिर प्रशासनाकडून परंपरेनुसार शेजघरातील चांदीचा पलंग १ जुलै ते १८ जुलै या कालावधीत काढून ठेवण्यात आला असून श्री विठ्ठलाला मऊ कापसाचा लोड, तर रुक्मिणी मातेला तक्या लावण्यात आला आहे.
१ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची काकड आरती, पोशाख, धूप आरती, शेज आरती आदी नित्योपचार प्रक्षाळपूजेपर्यंत म्हणजे १८ जुलैपर्यंत बंद रहातील. या कालावधीत देवाची नित्यपूजा, महानैवेद्य, गंध-अक्षता हे नित्योपचार चालू रहातील. श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन चालू असल्याने प्रतिदिन ४५ सहस्र भाविकांना पददर्शन, तर ५५ सहस्र भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे.