आणखी एकही झाड न तोडता एक वर्षात आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. आम्ही लोकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. विलंबामुळे या कामाचा व्यय १०-१५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. पावसाळ्याचे ३ मास सोडले, तर एका वर्षात एकही झाड न तोडता आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना ते बोलत होते.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,
१. न्यायालयातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण देऊ.
२. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी सर्व मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येईल.
३. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांसाठी पक्षादेश काढला, तसा एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही पक्षादेश काढला. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांचे म्हणणे अध्यक्ष फेटाळू शकतात. न्यायालयातही त्यांची बाजू टिकेल का ? याविषयी शंका वाटते.