‘पितांबरी’च्या वतीने रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे वृक्षारोपण
रायपाटण (राजापूर) – ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या आस्थापनाच्या ‘पितांबरी नर्सरी फ्रंचायजी तळवडे’ (फ्रंचायजी म्हणजे एखाद्या आस्थापनाचा माल विशिष्ट प्रदेशात विकण्याची अधिकृत अनुमती) यांच्या वतीने ‘हरितपंचक्षेत्र’ योजनेअंतर्गत कृषीदिनाच्या औचित्यावर वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे मेजर तळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळी वड, कोकम, बहावा, बांबू, चंदन, पिंपळ, औदुंबर आणि चिंच यांसारख्या ५० हून अधिक देशी झाडांचे रोपण रायपाटण पोलीस दूरक्षेत्र यांच्या सीमेत झाले. योजनेद्वारे प्रत्येक गावात शाळा, पाणवठे, ग्रामपंचायत, सरकारी कार्यालये, स्मशानभूमी येथे येत्या ४ वर्षांत १ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे लक्ष्य आस्थापनाने ठेवले आहे.
या वेळी आस्थापनाचे तुषार हळदवणेकर, राहुल प्रभुदेसाई, प्रणव मुळ्ये, भास्कर गोठणकर, श्रीहरी शौचे, सुयोग सप्रे, संतोष चव्हाण आणि अन्य कर्मचारी, तसेच दूरक्षेत्र रायपाटणचे मेजर तळेकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. मेजर तळेकर यांनी उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.