गुन्हे नोंद करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करावी !
|
बीड, ३ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील हिंदु देवस्थान इनामी भूमीचे अवैध हस्तांतरण प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाने दिलेल्या चौकशी अहवालानंतर गुन्हे नोंदवण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी उपजिल्हाधिकारी (सामान्य) भू-सुधार विभागातील नायब तहसीलदार अभय जोशी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे; मात्र अभय जोशी यांनी जिल्हाधिकार्यांकडे नियुक्ती रहित करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे वरील प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी वरिष्ठ पदावरील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी भू-सुधार विभाग किंवा पोलीस अधीक्षक यांची गुन्हे नोंद करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, तालुकाध्यक्ष शेख युनूस चर्हाटकर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे बीड जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून केली आहे. नायब तहसीलदार अभय जोशी यांनी जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे कळवले आहे की, मी बीड जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असून गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही माझ्याकडून झाल्यास भविष्यात मला शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून माझी नियुक्ती रहित करण्यात यावी.
केवळ आष्टी नव्हे, तर बीड जिल्ह्यातील सर्व देवस्थान इनामी भूमी अपहार प्रकरणांची चौकशी करा ! – डॉ. गणेश ढवळे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती
बीड जिल्ह्यातील केवळ आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान मुर्शदपूर, विठोबा देवस्थान पांढरी, विठोबा देवस्थान खडकत, खंडोबा देवस्थान बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान चिंचपूर आणि पिंपळेश्वर महादेव देवस्थान आष्टी या देवस्थानांचेच विशेष अन्वेषण पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करण्यात आले असून बीड जिल्ह्यातील अन्य नामलगाव येथील आशापूरक देवस्थान, पालवण येथील श्रीरामचंद्र देवस्थान, नेकनूर येथील गोसावी मठ, खापरपांगरी येथील श्रीरामचंद्र देवस्थान, बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील कालिंदेश्वर मंदिर, तसेच अंबाजोगाई शहरातील थोरले दत्तात्रेय देवस्थान आणि धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थान आदी ठिकाणी अवैध हस्तांतरण प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाकडून अन्वेषण करण्यात येऊन संबंधित दोषींवर गुन्हे नोंद करण्यात यावेत.
४ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पिंडदान आंदोलन’ !
अवैध हस्तांतरण प्रकरणात गुन्हे नोंद करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणार्या जिल्हा प्रशासनाचे ‘प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन’ ४ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याची चेतावणीही डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.