बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राज्य स्थापन झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत, अशी हिंदुत्वाला धरून राज्यकारभार करण्याची ग्वाही नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. ३ जुलै या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सभागृहात त्यांनी वरील विधान केले.
ते पुढे म्हणाले…
१. आतापर्यंत महाराष्ट्र आणि भारत यांच्या इतिहासात सत्तेसाठी पक्ष सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; परंतु सत्तेतून बाहेर पडल्याचे आमचे पहिलेच उदाहरण आहे.
२. मी नगरविकासमंत्री असतांना माझ्यासह ९ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. एकीकडे सत्ता आणि दुसर्या बाजूला बाळासाहेब ठाकरे अन् आनंद दिघेसाहेब यांचा सर्वसामान्य सैनिक असलेल्या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला, हे मी माझे भाग्य समजतो.
३. काहींनी तुमच्याकडील १५-२० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले. ‘त्यांची नावे मला सांगितली, तर मी त्यांना विमानाने सोडतो’, असे सांगितले. एका आमदाराला स्वतंत्र ‘चार्टर्ड फ्लाईट’ करून मी स्वत:च्या पैशाने सोडले.
४. आम्ही कुणावरही कोणत्याही प्रकारे बळजोरी केली नाही. भाजपकडे ११५ आमदार असतांना आणि आमच्याकडे केवळ ५० आमदार असतांना देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री केले. याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मनापासून अभिनंदन करतो.