विवाह जुळवण्यातून फसवणूक !

भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या चालीरितीनुसार पंचक्रोशी, नात्यांमधील, माहितीतील मुला-मुलीशी विश्वासू मध्यस्थ आणि नातेवाइक यांच्या वतीने विवाह जुळवले जात होते. बहुतांश वेळा ते यशस्वी व्हायचे; कारण विवाहात समस्या उद्भवल्यास मध्यस्थी असलेल्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नातेवाइक समुपदेश करून त्या सोडवत होते.

कालांतराने विवाह जुळवणे, हा पैसा कमावणे, व्यावसायिक, तसेच विज्ञापनाचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, संकेतस्थळ, वर्तमानपत्रांतील विज्ञापन, वधू-वर मेळावे, विवाह जमवणारे दलाल अस्तित्वात आले. यामध्ये काहींचा हेतू वधू अथवा वर यांची, तसेच त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे असा झाला आहे. ही गुन्हेगारी वृत्ती समाजासाठी घातक बनली आहे. त्यामुळे सध्या अनेकांची फसवणूक झालेली दिसून येते. अशा वेळी संबंधितांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाचे साहाय्य घ्यावे आणि आपल्यासारखे अन्य लोक फसणार नाहीत, यासाठी जनजागृती करायला हवी. तसे झाल्यास इतर लोक सावध होतील. अशा प्रकारचे कोणतेही व्यवहार करतांना याविषयी अधिकाधिक पुरावे, तसेच माहिती, संबंधित लोकांची छायाचित्रे, कागदपत्रे आणि नोंदणी पडताळून पहायला हवी. कोणतीही संस्था, संघटना आणि व्यक्ती विवाह जमवण्याचा व्यवहार करत असल्यास त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र अन् ओळखीचा पुरावा मागून घ्यावा. त्यांनी शिफारस केलेले स्थळ अथवा वधू यांचाही जन्मदाखला, त्यांची कागदपत्रे, विधवा-विदुर सांगितले असल्यास त्याचा पुरावा, मुले असल्यास त्यांचे पुरावे, तसेच त्या स्थळाचा इतिहास आणि पार्श्वभूमी जाणून घ्यावी. संबंधित मुलगी अथवा मुलगा यांचे मूळ गाव, इतर नातलग, त्यांचे शिक्षण, नोकरी व्यवसाय सांगितले असल्यास त्याविषयीचे पुरावे यांची शहानिशा जरूर करावी. विवाह जमवण्याआधी वधू-वर यांचे वय विवाहाच्या वयात आहे ना ? हे पडताळणे अनिवार्य आहे, अन्यथा हीच मंडळी विवाहानंतर अल्पवयीन वधूशी विवाह केला; म्हणून मुलाला धमक्या देतात. यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वस्तूनिष्ठ माहिती घेणे आणि फसवणूक झाल्यास संबंधितांनी जागृती करणे महत्त्वाचे !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई