राष्ट्रीय जीवनासाठी शक्तीसंचयाची खाण असलेली उपनिषदेच शक्तीस्थाने बनू शकतात ! – स्वामी विवेकानंद
आज ४ जुलै २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
उपनिषदांच्या एकेका पानातून जे सांगण्यात आले, ते म्हणजे ‘शक्ती !’ गेली सहस्रो वर्षे आमचा वंश अधिकाधिक दुर्बल बनत जाईल, अशीच प्रत्येक गोष्ट झाली. या प्रदीर्घ कालखंडामध्ये केवळ हेच एक अंतिम उद्दिष्ट दृश्यमान होत होते. आपण अधिकाधिक दुर्बल बनत जाऊन, गांडुळांसारखे वळवळत राहून, जो आपल्याला त्याच्या पायाखाली चिरडून टाकायला निघाला आहे, त्याच्याच पायाशी लोळण घेत राहिल्याने आमचे राष्ट्रीय जीवन अधोगतीला पोचले होते.
आपल्याला केवळ शक्तीचीच आवश्यकता असून प्रत्येक क्षणी ‘शक्ती’, ‘शक्ती’, असाच ध्यास हवा ! उपनिषदे म्हणजे प्रचंड शक्तीसंचय असलेली मोठी खाण आहे. ही उपनिषदेच हाती तुतारी घेऊन सार्या दुर्बल जनांना, दुःखी, कष्टी आणि विविध स्तरांवरील लोकांना सांगतील की, तुम्ही तुमच्या पायावर उभे रहायला शिका आणि मुक्त व्हा ! ही मुक्ती म्हणजे शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य ! हे उपनिषदांचे तीन परवलीचे शब्द आहेत.