स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या आवरणामुळे गुरुकृपा अनुभवू शकत नसल्याविषयी खंत व्यक्त करणाऱ्या अमेरिका येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राजलक्ष्मी जेरे !
१. गुरुकृपेचा सातत्याने होत असलेला वर्षाव ग्रहण करता येत नसल्यामुळे ‘स्वतः आतून कोरडी आहे’, असे वाटणे
मागील अनेक दिवसांपासून मला वाटत होते की, ‘मी अजूनही गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेपासून पुष्कळ दूर आहे. ‘मी त्यांच्याशी भावाच्या पातळीवर जोडले गेले आहे’, असे मला वाटत असले, तरी आध्यात्मिक स्तरावर ‘मी त्यांच्या कृपेपासून पुष्कळच दूर आहे’, असे मला वाटते; कारण माझे प्रतिदिनच्या साधनेचे प्रयत्न न्यून होत आहेत. ‘श्री गुरूंच्या कृपेचा प्रवाह सतत वहात असूनही मी ती कृपा का ग्रहण करू शकत नाही ? श्री गुरूंच्या कृपेचा वर्षाव होत असूनही मी आतून कोरडी का आहे ?’, याचे कारण मला समजत नव्हते.
२. साधिकेमधील अनेक स्वभावदोष आणि अहं यांमुळे श्री गुरु अन् साधिका यांच्यामध्ये ‘अहं’ची जाड भिंत निर्माण झाल्यामुळे साधिकेला गुरुकृपा अनुभवता न येणे
तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझ्यातील स्वार्थीपणा, कर्तेपणा, राग येणे, अपेक्षा असणे, भीती वाटणे, ‘मला येते’ हा अहंचा विचार, इतरांविषयी प्रेम नसणे’, हे आणि इतर अनेक स्वभावदोष अन् अहं यांमुळे माझ्याभोवती ‘मी’पणाची (अहंची) जाड आणि भक्कम भिंत निर्माण झाली आहे. त्या भिंतीमुळे श्री गुरूंची कृपा माझ्यापर्यंत पोचण्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. गुरुकृपेच्या प्रवाहात जणू ‘मी’पणाचे धरणच निर्माण झाले असल्यामुळे तो प्रवाह माझ्यापर्यंत पोचू शकत नाही. ‘मी’पणाची ही भिंतच मला श्री गुरूंच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्यापासून रोखत आहे, म्हणजे ‘मीच स्वतःला श्री गुरूंकडे जाण्यापासून रोखत आहे.’ त्यामुळे मी आतून कोरडी आहे.
३. ‘स्वतःमधील ‘अहंभाव’ नष्ट करण्यासाठी गुणाचे संवर्धन केल्यास श्री गुरूंची कृपा अनुभवता येईल’, असे लक्षात येणे
यावर मात करण्यासाठी मला ‘शरणागती, कृतज्ञता, आज्ञाधारकपणा, साधनेचे गांभीर्य वाढवणे आणि इतरांविषयी प्रेम वाटणे’ ही गुणांची दारे उघडली पाहिजेत. त्यामुळे श्री गुरूंची कृपा माझ्याकडे वहाण्यास आरंभ होईल आणि हळूहळू ‘मी’पणाचे हे धरण विरघळून जाईल.
मला याची जाणीव करून दिल्यामुळे मी परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते की, गुणांची दारे उघडण्यासाठी अन् आपल्या कृपेस पात्र होण्यासाठी मला साहाय्य करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका (२२.५.२०२०)