देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चेतावणी
नवी देहली – हवामान विभागाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, देहली, पंजाब, हरियाणा यांसह देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची चेतावणी दिली आहे. जुलैमध्ये देशात सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये २ घंट्यात ३.२ इंच (अनुमाने ८१ मिमि) पाऊस पडला. यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली होती. राजस्थानमधील अजमेर येथे ११ वर्षांनंतर ४ इंच (अनुमाने १०१ मिमि) पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यावर पूर आल्यासारखी स्थिती होती आणि शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.
बिहारमध्ये ३ दिवसांत वीज पडून २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये २० घंट्यात ८ इंच (अनुमाने २०३ मिमि) पाऊस पडला. ज्यामुळे शहराची अवस्था तलावासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई उपनगरासह पुढील २४ घंट्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.