विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप
‘पुढे येणाऱ्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि त्यांची औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा ‘कोणत्या आजारासाठी कोणता उपाय करायचा’, हे कळणे कठीण जाईल. तेव्हा हे कळावे; म्हणून साधकांनी हा लेख संग्रही ठेवावा आणि त्यात दिल्याप्रमाणे नामजप करावा. त्यामुळे आजार अल्प होण्यास लाभ होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.६.२०२२) |
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत. मी शोधलेले हे जप साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) काही विकार, त्यांवरील जप आणि साधकांनी तो जप केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये छापल्या होत्या. आज आणखी काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे नामजप गेल्या ३ मासांत काही साधकांना दिले आहेत. साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती लवकरात लवकर ग्रंथासाठी लिहून या लेखाच्या शेवटी दिलेल्या इ-मेल पत्त्यावर किंवा टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात.
टीप १ – एखाद्या विकारासाठी दिलेले नामजप त्या क्रमाने म्हटले की, तो एक नामजप झाला. असा हा नामजप नियोजित कालावधीपर्यंत पुन:पुन्हा करायचा.
टीप २ – ‘मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी (मज्जापेशी) म्हणजेच ‘न्यूरॉन्स’ अकार्यरत झाल्यास, त्या भागाकडून केली जाणारी संबंधित कृती होत नाही. येथे ‘बोलता न येणे; पण गाऊ शकणे ’, असे उदाहरण दिले आहे. या संदर्भातील विवेचन पुढीलप्रमाणे आहे.
१. बोलता न येणाऱ्यास गाता येणे संभव आहे.
२. डाव्या मेंदूच्या पुढच्या भागातील बोलण्याशी निगडित क्षेत्रातील (ब्रोकाज एरिया) चेतापेशी अकार्यरत झाल्यास व्यक्तीच्या बोलण्यावर परिणाम होतो. तिला दुसऱ्याचे बोलणे समजत असते. ती व्याकरणदृष्ट्या योग्य, म्हणजे क्रियापदे, क्रियाविशेषणे, विशेषणे इ. वापरून बोलू शकत नाही; मात्र ती काही अर्थपूर्ण शब्दांचे उच्चारण करू शकत असते. त्यामुळे तिचे बोलणे ‘टेलेग्राफिक स्पीच’ प्रमाणे होते. गायन ही उजव्या मेंदूशी संबंधित बाब आहे. त्यामुळे ‘ब्रोकाज एरिया’मधील चेतापेशी अकार्यरत झाल्या, तरी व्यक्तीची गायनक्षमता अबाधित रहाते. येथे ‘गायनक्षमता’ म्हणजे विशेषकरून ‘मेलडी’ (चाल, संगीत-रचनेतील मुख्य धून, आलापी) गाण्याची क्षमता अबाधित रहाते.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (२.७.२०२२)
१. वरील विकारांपैकी काही विकारांच्या संदर्भात सांगितलेल्या जपांविषयी साधकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव
१ अ. नागीण होणे : ऑगस्ट २०२१ मध्ये एका साधिकेला मानेपासून पाठीपर्यंत नागीण झाली. मी तिला या विकारावर जप दिला. नागीण झाल्यावर पुष्कळ वेदना आणि दाह होतो. हा विकार बरा व्हायला साधारणतः १ मास (महिना) लागतो, असा वैद्यांचा अनुभव आहे. साधिका मी दिलेला नामजप प्रतिदिन १ घंटा करू लागल्यावर तिला फारशा वेदना आणि दाह झाला नाही, तसेच ५ व्या दिवसापासून तिचा हा विकार बरा व्हायलाही आरंभ झाला. असाच अनुभव आणखी ४ साधकांनाही आला. त्यांचाही हा विकार ५ व्या दिवशी बरा होऊ लागला.
१ आ. क्षयरोग (टी.बी.) होणे : ऑगस्ट २०११ मध्ये एका साधिकेला (वय ६७ वर्षे) क्षयरोग झाल्याचे निदान झाले. नुकताच तिला ‘कोरोना’चा संसर्ग झाला होता आणि आता क्षयरोग झाल्याने ती पुष्कळ घाबरून गेली होती. ती वयस्करही होती. मी तिला क्षयरोग बरा होण्यासाठी नामजप दिला. ती औषधे घेण्यासमवेतच प्रतिदिन २ घंटे नामजप करत होती. तिने नामजप २ मास (महिने) केल्याने तिचा क्षयरोग पुष्कळ प्रमाणात न्यून झाला, तसेच तिच्या मनाची स्थिती पुष्कळ सुधारली. तिला धैर्य आले. ‘आपण बरे होऊ शकू’, हा आत्मविश्वास तिच्यात आला. पुढे आणखी ४ मास तिने औषधोपचार घेण्यासह नामजपही केल्यावर एकूण ६ मासांनी तिचा क्षयरोग पूर्णपणे बरा झाला. क्षयरोग बरा होण्यास सध्या ६ ते ९ मास लागतात. ‘साधिकेचा क्षयरोग नामजपामुळे लवकर पूर्ण बरा झाला’, असे दिसून आले.
१ इ. जखमेमध्ये जंतूसंसर्ग होणे : सप्टेंबर २०२१ मध्ये एक साधक पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ जखम झाली होती. त्या जखमेमध्ये पू (जंतूसंसर्ग) व्हायला आरंभ झाला होता. ‘जखमेमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये’, यासाठी मी त्याला जप दिला. तो त्याने प्रतिदिन २ घंटे केल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्याच्या जखमेतील जंतूसंसर्ग न्यून होऊ लागला आणि ४ दिवसांत ती जखम बरी झाली. त्यामुळे डोळ्याला काही इजा होण्याचा धोका टळला.
१ ई. ऑटो इम्यून डिसऑर्डर (स्वतःतील प्रतिकारशक्तीने स्वतःच्या शरिरावर आक्रमण करणे)
१. सप्टेंबर २०२१ मध्ये या विकारामुळे एक साधक पीडित होता. या विकारामुळे त्याच्या आतड्याला अल्सर झाला होता. त्यामुळे त्याच्या शौचावाटे रक्त पडायचे. त्याला ना गोड पदार्थ खाता यायचा ना तिखट. तो केवळ भाताच्या पेजेवर होता. त्यामुळे तो अशक्त होऊ लागला होता. त्याला आयुर्वेदीय औषधेही चालू होती; पण गुण येत नव्हता. मी त्याला या विकारावर नामजप दिला. साधक तो नामजप प्रतिदिन १ घंटा करायचा. त्यामुळे त्याला एका मासात (महिन्यात) पालट जाणवू लागला. त्याला शौचावाटे रक्त पडायचे बंद झाले. त्याला थोड्या प्रमाणात अन्य अन्नपदार्थही खाता येऊ लागले. एकूण ३ मासांमध्ये त्याचा तो विकार पूर्णपणे दूर झाला.
२. एका साधिकेला या विकारामुळे सर्व अंगभर पुष्कळ जखमा झाल्या होत्या. त्या जखमा इतक्या होत्या की, तिला कपडे घालणेही कठीण झाले होते. या विकारावर कोणतेही वैद्यकीय उपचार लागू पडत नसल्याने ती पुष्कळ निराशेत गेली होती. तिला मी या विकारावरील नामजप दिल्यावर एका मासात तिच्या अंगावरील सर्व जखमा भरून आल्या आणि बऱ्या झाल्या. त्यानंतर तिला पुन्हा जखमा झाल्या नाहीत.
१ उ. कर्करोग : एका हितचिंतकाच्या तरुण मुलाला ‘बोन मॅरो कॅन्सर’(हाडांचा कर्करोग) झाला होता. हा कर्करोग त्याच्या शरिरात ५५ टक्के पसरला होता. मी त्या हितचिंतकांना कर्करोगावरील नामजप दिला. त्यांनी तो नामजप आपल्या मुलासाठी १ मास प्रतिदिन २ घंटे केला. त्यानंतर त्यांच्या मुलाची पुन्हा चाचणी केली असता त्याच्या शरिरातील कर्करोगाचे प्रमाण ५५ टक्क्यांवरून ०.५ टक्क्यांवर आले होते. तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि त्या हितचिंतकांना म्हणाले, ‘‘जर कर्करोगाचे प्रमाण ०.०५ टक्क्यांवर आले, तर तुम्हाला ‘बोन मॅरो रिप्लेसमेंट’ करावी लागणार नाही आणि तुमचा १२ – १३ लाख रुपयांचा व्यय (खर्च) वाचेल.’’ हे समजल्यावर मी त्या हितचिंतकांना कर्करोगावरील जप प्रतिदिन २ घंट्यांऐवजी ३ घंटे करण्यास सांगितला.
१ ऊ. मल्टीपल स्क्लेरोसीस (मध्यवर्ती मज्जासंस्था दुर्बल होणे) : एका साधकाला हा विकार वयाच्या २८ व्या वर्षापासून गेली १४ वर्षे आहे. या विकारामध्ये त्याला पायांना झिणझिण्या येणे, मुंग्या येणे, टोचल्यासारखे होणे, भाजल्यासारखे जाणवणे किंवा बधिरता येणे, असे होत होते आणि त्यानंतर ही लक्षणे अन्य अवयवांमध्ये पसरत होती. हा एक तीव्र स्वरूपाचा विकार आहे. या विकाराची लक्षणे या साधकाला दिवसा जाणवू लागायची आणि रात्री ती तीव्र व्हायची. मी त्याला या विकारावर ऑक्टोबर २०२१ मध्ये नामजप दिला. त्याने ‘नामजप केव्हा करायचा ?’, याचे नियोजन केले. त्याने नामजपांची ३० मिनिटांची सत्रे करायचे ठरवले. विकाराची लक्षणे दिसू लागली की, तो ३० मिनिटे नामजप करायचा. यामुळे त्या विकाराची लक्षणे न्यून होऊन त्याला १ ते २ घंटे आराम मिळायचा. लक्षणांना पुन्हा आरंभ झाला की, तो ३० मिनिटे नामजप करायचा. बहुतेक वेळा त्याला सायंकाळी किंवा रात्री हा नामजप करावा लागायचा. अशा प्रकारे त्याने हा विकार दूर होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. यामुळे त्याला दिसून आले की, दिवसेंदिवस त्या विकाराची लक्षणे निर्माण होण्याची वारंवारता घटू लागली आहे आणि २ मासांनी (महिन्यांनी) लक्षणांची तीव्रताही पुष्कळ घटली आहे.
२. जपांचे महत्त्व
आपत्काळात औषधे, डॉक्टर यांची टंचाई भासेल, तेव्हा या जपांचा चांगला उपयोग होईल.
३. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी हे जप शोधू शकलो आणि त्या जपांची चांगली परिणामकारकताही लक्षात आली. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.६.२०२२)
साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणाऱ्या अनुभूती साधकांनी sankalak.goa@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता सिद्ध होण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतील.
टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.