चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा दळणवळण बंदीची शक्यता
वुहान (चीन) – येथे पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. येथे ३० जून या दिवशी १२७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळेच येथे पुन्हा दळणवळण बंदी लागू होण्याची शक्यता आहे. चीनने शांघाय आणि बीजिंग येथील दळणवळण बंदी १ जूनपासून हटवण्यात येत असल्याचे घोषित केले होते. एका मासातच वुहानसह परिसरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे चीनचे ‘झीरो कोविड’चे धोरण अयशस्वी ठरल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. ‘झीरो कोविड’ धोरणामुळे चीनमध्ये आजदेखील एक जरी रुग्ण आढळला, तरी त्यास रुग्णालयात भरती करावे लागते, तसेच परिसरात सामुदायिक चाचणी अभियान राबवले जाते. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.