युद्धामुळे युक्रेनला प्रतिमास जवळपास ४० सहस्र कोटी रुपयांची हानी !
पाश्चात्त्य आस्थापनांनी रशियातून काढली २३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !
कीव्ह / मॉस्को – युक्रेनने त्याची राजधानी कीव्ह कह्यात घेण्याची रशियन योजना उधळून लावली असली, तरी दीर्घ युद्धाचा विचार केला, तर रशिया जिंकत असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने स्वेरडोनेत्स्क शहर कह्यात घेतले असून लवकरच तो लुहान्स्क प्रांताचा ताबा घेऊ शकतो. प्रतिदिन २०० युक्रेनी सैनिक मारले जात आहेत. सैनिकी हानीसमवेतच युक्रेनची अर्थव्यवस्थाही कोलमडत आहे. युक्रेनला प्रतिमास ३९ सहस्र ५५२ कोटी रुपयांची हानी होत आहे.
१. युक्रेनच्या तुलनेत रशिया आर्थिक आणि सैनिकी दृष्ट्या पुष्कळ सामर्थ्यवान आहे. युद्ध चालू झाल्यावर पाश्चात्त्य आस्थापनांनी रशियातून २३.७३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली.
२. प्रदीर्घ युद्ध रशियासाठी लाभदायी आहे, असे म्हटले जात आहे. तथापि युक्रेनसाठीही सर्व काही संपलेले नाही. त्याच्याकडे मोठ्या संख्येने सैनिक आहेत. त्याला पाश्चात्त्य देशांकडून सैनिकी साहाय्यही मिळत आहे.
३. रशियाची पुढे सरकण्याची गती मंद आणि आर्थिकदृष्ट्या महागडी आहे. ‘नाटो’ची आधुनिक शस्त्रे, नवीन डावपेच आणि भरीव निधी, यांमुळे युक्रेन रशियन सैन्याला माघार घेण्यास भाग पाडू शकते.
४. येणार्या हिवाळ्यात रशिया युरोपीयन युनियनच्या सदस्य देशांमध्ये गॅस टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सूत्रावर या देशांची एकता धोक्यात येऊ शकते. युक्रेनचे पारडे जड राहिल्यास पुतिन युद्ध लांबवतील, अशी ‘नाटो’ देशांना चिंता आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्या सैन्यांची दुरवस्था !एका युक्रेनियन जनरलच्या मते, १५ जून २०२२ पर्यंत युक्रेनी सैन्याची १ सहस्र ३०० चिलखती वाहने, ४०० रणगाडे आणि ७०० तोफखाने नष्ट झाले. अनेक अनुभवी आणि उच्च प्रशिक्षित तुकड्या नष्ट झाल्या. युक्रेनियन सैन्यातून लोक पळून गेल्याचे वृत्त आहे. रशियन सैन्यासाठीही परिस्थिती सोपी नाही. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर नवीन सैनिक मैदानात उतरवले जात आहेत. प्रशिक्षित सैन्याच्या न्यूनतेमुळे रशियाला ‘डॉनबास’ आणि ‘स्वेरडोनेत्स्क’ कह्यात घेण्यास बराच वेळ लागला. |