पंजाब विधानसभेत ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात ठराव संमत !

भाजपचा विरोध

चंडिगड – तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी देणार्‍या केंद्र सरकारच्या अग्नीपथ या योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ३० जून या दिवशी ठराव संमत करण्यात आला. भाजपचे आमदार अश्‍वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. केंद्र सरकारने ही योजना त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग बाजवा यांनी केली. अकाली दलाचे आमदार मनप्रित सिंह अयाली यांनीही या ठरावास पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मांडला. ही योजना देशातील तरुणांच्या हितविरोधी आहे, असा आरोप भगवंत मान यांनी केला असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे मी हे सूत्र उपस्थित करणार आहे, असे मत त्यांनी मांडले.