भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !
एक तुझे नाम । शास्त्रांचा आधार ।
वेदांच्या जे पार । तत्त्व तुझे ।।
कलियुगी धर्म हा कोसांतरी ।
नामचि तारेल भवसागरी ।।
प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘एक तुझे नाम ।’ या भजनपंक्तींद्वारे नामाचे महत्त्व वर्णिले आहे. नामाविना ईश्वराची अनुभूती येत नाही. ईश्वरप्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे साधनामार्ग आहेत. दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग ! गवत आणि अग्नी एकत्र आले की, गवत जळते अन् जळून अग्नीरूप होते. भगवंताचे नाम घेतले, तर नाम सारी पापे जाळून टाकते आणि भक्त भगवंताशी एकरूप होतो. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या भगवंताच्या नामात रंगून जाणेच हितकारक !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – सुगम भक्तीयोग)