भक्ती म्हणजे काय ?
१. भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख. याची जाणीव साधना करणाऱ्या भक्ताला असल्यामुळे तो आर्ततेने सतत देवाला आळवत असतो.
२. ‘भाव १०० टक्के वाढल्यावर अहंचा नाश होतो आणि जीव भक्तीच्या स्तरावर पोचतो. भक्तीच्या स्तरावर केवळ भाव असतो; तेथे अहंचा अभाव असतो. भक्तीची अवस्था म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था; म्हणून तेव्हा भक्त आणि ईश्वर यांच्यात भेद नसतो, ते एकरूपच असतात. आपल्याला भक्तीची अवस्था प्राप्त करून ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे, हे ध्येय बाळगून भाववृद्धी करण्यासाठी साधना करायला हवी.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २३.३.२००७)
(संदर्भ : भावजागृतीसाठी साधना : खंड १)
भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे !
भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणाऱ्या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम आणि निरवधी सुखदायक आहे.
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
भक्त होण्यासाठी मन निर्मळ होणे आवश्यक !
‘भगवंत अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. या निर्मळ आणि प्रेमळ भगवंताशी एकरूप होण्यासाठी भक्तालाही त्याच्याप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ बनले पाहिजे. सत्यकथनामुळे जिवाच्या मनातील दूषितपणा चटकन न्यून होतो आणि त्याचे मन निर्मळ होऊ लागते. अशा निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो आणि परम सत्याची अनुभूती घेण्यास पात्र ठरतो. सत्यकथनाने जिवाच्या मनाचा त्याग होतो आणि त्याच्या मनोदेहाचे अल्प अवधीत शुद्धीकरण होते.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.७.२००६)
(संदर्भ : सनातन-निर्मित विविध ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)