भाव म्हणजे काय !
भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणे. भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ. भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा.
परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच सनातनच्या साधकांचे भावविश्वात भावमार्गाने मार्गक्रमण होणे !
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी काळानुसार गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली आहे. सहस्रो साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत. यामध्ये ते भाववृद्धीसाठीही प्रयत्न करत आहेत. प्रयत्न करतांना अनेक साधकांना अनेक प्रकारच्या अनुभूती येत आहेत. यामध्ये भावाचा ओलावा कसा निर्माण करायचा ? हे परात्पर गुरुदेवांनी सोप्या पद्धतीने शिकवले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘प्रत्यक्ष जीवनातही ईश्वर पहाता येतो’, हे साधकांच्या अनुभूतीस्वरूप विश्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी प्रायोगिक स्तरावर ईश्वर पहाण्याचे भावचक्षू दिले आहेत. अशा गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
सनातनच्या साधकांचा भावविश्वात होत असलेला प्रवास योग्य असण्याचे एकमेव कारण म्हणजे परात्पर गुरुदेवांसारख्या अवतारी जिवाच्या मार्गदर्शनाखाली तो होत आहे. स्वबळावर भाव जागृत करून भावविश्वाच्या पलीकडे जाणे कोणत्याही जिवाला शक्य नाही; केवळ परात्पर गुरुदेवांसारख्या सतत शिकणाऱ्या आणि दुसऱ्याला सर्व शिकवणाऱ्या विज्ञानी जिवामुळेच कलियुगात हे चमत्कार होत आहेत.
– श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १०.४.२००६)
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना खंड -१ )
भावानुसार देवतेचे आशीर्वाद मिळतात !
‘मंदिरांत ईश्वराची, देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते. मूर्तीकडे पहाणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात. शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते. ‘अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल’, हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते. आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो; मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात देव दिसत असतो.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९६) (३.२.२०२२)
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो
‘नाथा तुझ्या पायी जैसा ज्याचा भाव । तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या ॥’, असे भावाचे महत्त्व प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्णिले आहे.
ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणाऱ्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भावामुळे अहं न्यून होण्याचे प्रयत्न चालू होतात !
आपण आपले मन भावाच्या माध्यमातून ईश्वराला अर्पण करू शकतो. भावनिर्मितीमुळे आपले मन ईश्वरचरणी लीन होऊन आपली आध्यात्मिक उन्नती स्थुलातून सूक्ष्माकडे चालू होते. भावनिर्मिती झाल्यावर आपल्याला स्वतःतील ‘अहं’ची जाणीव अधिक प्रमाणात होऊ लागते. भावाच्या अस्तित्वासमवेतच आपल्याला स्वतःतील ‘अहं’च्या अस्तित्वाची जाणीवही होऊ लागते. भावामुळे आलेली आनंदाची अनुभूती अहं वाढल्याने घटते, हे साधकाला जाणवू लागते आणि त्याचे अहं-निर्मूलनाचे प्रयत्न वाढू लागतात.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – भावजागृतीसाठी साधना खंड -१)