अध्यात्मात असामान्य असणारी दैवी बालके !
• मन निर्मळ आणि बुद्धी प्रगल्भ !
• स्वभावदोष आणि अहं अल्प !
• आध्यात्मिक गुण अधिक प्रमाणात !
• सूक्ष्मातील कळण्याची अफाट क्षमता !
अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत. अल्प वयातच कुणी अभ्यासातील एखाद्या विषयात पारंगत असते, तर कुणी एखाद्या खेळामध्ये. व्यवहारातील या असामान्यत्वापेक्षा अध्यात्मातील असामान्यत्व कित्येक पटींनी उच्च असते. भारतात आद्यशंकराचार्य, संत ज्ञानेश्वर यांच्यासारख्या लहानपणीच संत असलेल्यांची, अनेक चमत्कार करण्याची क्षमता असणाऱ्यांची आणि जगाला मार्गदर्शन करणाऱ्यांची कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे अशांना ‘आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य बालक’, असे म्हणावे लागेल.
उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले बालसाधकही थोड्याफार प्रमाणात ‘आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य’ आहेत; कारण त्यांनी लहानपणीच अध्यात्मातील ५० ते ६१ टक्के पातळी, तर काहींनी ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठली आहे. त्यांचे विचार प्रगल्भ आहेत आणि ते सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. हे जीव सात्त्विक असून त्यांना जन्मापासूनच देवाप्रती ओढ आहे; म्हणून ते ‘दैवी बालक’ आहेत. भारतातील समाजाला ‘बाल कीर्तनकार’ ठाऊक आहेत. त्यांच्यापेक्षाही ही बालके श्रेष्ठ आहेत. या बालकांतील काही जण पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. आतापर्यंत उच्च स्वर्ग आणि महर् या लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६०० पेक्षाही अधिक बाल आणि युवा वयाच्या साधकांना सनातनने ओळखले आहे. ईश्वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे. त्यांच्यात भाव, तळमळ, त्याग, प्रेमभाव इत्यादी गुण आहेत. दैवी बालसाधकांचे विचार त्याच्या अनुभूती वाचल्या की, त्यांचे दैवी वेगळेपण लक्षात येते.