मारेकर्‍यांना मासाभरात फाशी व्हावी, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करू ! – गहलोत

उदयपूर येथे कन्हैयालाल यांचा शिरच्छेद केल्याचे प्रकरण

मारेकर्‍यांचे वकीलपत्र घेण्यास अधिवक्त्यांचा नकार

उदयपूर (राजस्थान) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जिहाद्यांनी शिरच्छेद केलेल्या कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांची ३० जून या दिवशी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कन्हैयालाल यांना आदरांजली वाहत ते म्हणाले, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या घटनेचे अन्वेषण चालू केले आहे. ‘एका मासात आतंकवाद्यांना फाशी द्यावी’, अशी राज्य सरकारची इच्छा आहे. यासाठी आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करू.’ या वेळी मुख्य सचिव उषा वर्मा यांनी कन्हैयालाल यांची पत्नी यशोदा यांना ५० लाख रपयांचा धनादेश दिला.

आणखी दोघांना अटक

कन्हैयालाल यांची हत्या करणारे रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांना अटक केल्यानंतर आता मोहसिन अन् आसिफ या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. यासह आणखी ३ जणांची चौकशीही केली जात आहे. अन्सारी आणि गौस यांचे वकीलपत्र घेण्यात कुणी अधिवक्ता सिद्ध नाही.

पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांचे स्थानांतर !

राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांनी बंदचे आवाहन केले आहे. लोकांमध्ये उदयपूर हत्याकांडावरून पुष्कळ संताप आहे. बंदला लोकांकडून समर्थनही प्राप्त होत आहे. घटनेसाठी उदयपूरचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार आणि पोलीस महानिरीक्षक हिंगलाजदान यांना उत्तरदायी ठरवत राजस्थान सरकारने त्यांचे स्थानांतर केले आहे. (केवळ स्थानांतर करून काय होणार ? अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांना घरीच बसवले पाहिजे ! – संपादक)