श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीवर प्रशासक येणार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ ३ जुलैला संपणार
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ येत्या ३ जुलैला संपत आहे. त्यापूर्वी नवे पदाधिकारी नेमले न गेल्यास समितीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे. वर्ष २०१७ मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने डॉ. अतुल भोसले यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. वर्ष २०१९ मध्ये समितीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी त्यागपत्र दिल्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले. अध्यक्षपदाचा भार सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्याकडे देण्यात आला होता.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समितीकडे मंदिर परिसर, परिवार देवता, मंदिरांची देखभाल, देवाचे पारंपरिक नित्योपचार, दर्शन सुविधा आणि देवस्थानच्या जमा-खर्चाचे दायित्व आहे. त्यामुळे मंदिर समितीवर कार्यक्षम पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मागील ६ मासांपासून समितीवर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी नाहीत. समिती बरखास्त होत असल्याने भाविकांच्या सोयीसुविधा, देवस्थानची देखभाल, पारंपरिक नित्योपचार करण्याचे दायित्व सरकारी प्रशासकाकडे येणार आहे.