व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची तीव्र तळमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मधुमालती नाईक (वय ८३ वर्षे) !
वर्ष १९९५ पासून श्रीमती मधुमालती नाईक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्या प्रथम आवृत्तीपासूनच त्यांचे वितरण करणे, प्रदर्शन कक्ष लावणे’, अशा सेवांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत. मार्च २०२० मधील दळणवळण बंदीमुळे त्यांचे बाहेर पडून सेवा करणे न्यून झाले, तरीही त्यांनी व्यष्टी साधना तेवढ्याच तळमळीने चालू ठेवली आहे. सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. राजश्री खोल्लम, पुणे
१ अ. शिकण्याची वृत्ती : ‘नाईककाकूंमध्ये वयाच्या ८३ व्या वर्षीही शिकण्याची वृत्ती आहे. ‘ऑनलाईन’ सत्संगाला कसे जोडायचे ?’, हे शिकण्यासाठी त्या माझ्या घरी आल्या आणि त्यांनी २ घंटे थांबून माझ्याकडून ती प्रक्रिया शिकून घेतली.
१ आ. समष्टी सेवेची तळमळ
१. ‘समष्टी सेवा’ हा जणू काकूंचा श्वास आहे. त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या ३० आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १२ अंकांचे प्रतिदिन वितरण करत असत. त्यांनी अनेक वर्षे प्रत्येक सप्ताहात १० ते १२ फलकांवर लिखाण (फलकावर धर्मशिक्षणाविषयी लिखाण करणे) केले आहे.
२. काकू या वयातही १ – २ फलक लिखाण करतात. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. ‘त्यांचे वय ८३ वर्षे असूनही त्या फळ्यावर व्यवस्थित लिहू शकतात’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. काकूंनी ‘सनातन प्रभात’च्या अनेक वाचकांना जोडून ठेवले आहे. त्या आजही अनेक वाचकांना संपर्क करून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवा करतात. त्यांना वाचकांच्या घरी जायला जमले नाही, तर वाचक त्यांच्या घरी येऊन सात्त्विक उत्पादने घेऊन जातात. कुणी १ – २ मास उत्पादने घ्यायला आले नाही, तर काकू त्यांना स्वतःहून भ्रमणभाष करून विचारतात.’
२. सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे
२ अ. स्वीकारण्याची वृत्ती
१. ‘आरंभी घरातील प्रसंगांत काकूंचा पुष्कळ संघर्ष होत असे. ‘परिस्थिती स्वीकारण्याने साधना होणार आहे’, हे समजल्यावर त्यांनी संघर्षावर मात करून परिस्थिती स्वीकारणे चालू केले.
२. त्यांची धाकटी बहीण (सुश्री (कु.) शशिकला रामलाल नाईक, वय ७२ वर्षे) ७ वर्षांपासून रुग्णाईत आहे. पूर्वी काकूंना तिची पुष्कळ काळजी वाटत असे आणि त्यांना वाईटही वाटायचे. त्यामुळे मला ‘त्या बहिणीमध्ये अडकल्या आहेत’, असे वाटत होते; परंतु आता काकूंनी सर्व भार देवावर सोपवला आहे. त्या बहिणीचे सर्व ‘सेवा’ म्हणून करतात.
काकूंमध्ये असलेले गुण माझ्यात येऊन माझ्याकडून त्यांच्याप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने होवोत’, अशी गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना आहे. ‘माझ्याकडून वरील सर्व सूत्रे लिहून घेतली’, याबद्दल भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. सौ. विजया भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. राजश्री खोल्लम
३ अ. स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ : ‘काकू त्यांच्याकडून झालेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न मोकळेपणाने सांगतात. त्या घरात घडणारे प्रसंग, त्यांच्या मनात आलेल्या प्रतिक्रिया, नकारात्मक विचार सर्व प्रांजळपणे सांगतात. ‘प्रसंगातून बाहेर कसे पडता येईल ?’, असेही त्या विचारतात. त्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्रेही करतात. काकू म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे घडायचे आहे.’’
४. सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
४ अ. सेवेची तळमळ
१. ‘नाईककाकूंचे वय अधिक असूनही त्यांच्यात समष्टी सेवेची तीव्र तळमळ आहे. त्या मला विचारतात, ‘‘माझ्याकडून पूर्वीप्रमाणे समष्टी सेवा होत नाही. आणखी काय करू ?’’ त्यांच्या बोलण्यातून ‘त्यांना वयोमानानुसार प्रसारातील काही गोष्टी करणे शक्य होत नाही. समष्टी सेवा होत नाही’, अशी खंत जाणवते.
२. त्या जिज्ञासूंना भ्रमणभाषवर संपर्क करून त्यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार बनवतात. तसेच ‘सनातन वही आणि सनातन पंचांग’ यांची मागणी घेतात.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना त्यांचा भाव दाटून येतो.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१६.३.२०२२ )