खरीप ज्वारी, मका आणि बाजरी या पिकांच्या लागवडीची ठळक वैशिष्ट्ये
खरीप ज्वारी, मका आणि बाजरी या पिकांची योग्य वेळी पेरणी, सुधारित वाणांचा (जातींचा) वापर, सेंद्रिय अन् रासायनिक खतांचा वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन, तसेच पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास भरघोस उत्पादन मिळण्यास निश्चित साहाय्य होईल. त्यासाठी पुढे नमूद केलेल्या गोष्टींचा शेतकर्यांनी अवलंब करणे आवश्यक आहे.
१. खरीप ज्वारी
१ अ. हवामान : ज्वारीच्या पिकास उष्ण आणि कोरडी हवा चांगली मानवते. हे पीक कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक घेऊ नये.
१ आ. भूमी : चांगला निचरा असलेली आणि ५.५ ते ८.५ सामू (पी.एच्.) असलेल्या भूमीत हे पीक घेता येते. चिकणमातीची, मध्यम ते काळी भूमी यासाठी योग्य आहे.
१ इ. पूर्वमशागत : भूमीची चांगली नांगरट करावी आणि त्यानंतर २ ते ३ वेळा वखराच्या (कुळवाच्या) पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १० ते १२ टन प्रतिहेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीत मिसळावे.
१ ई. विद्यापिठाने शिफारस केलेल्या सुधारित आणि संकरित जाती
१. सुधारित वाण (जाती) : एस्.पी.व्ही. -४६२, सी.एस्.व्ही.-१३, सी.एस्.व्ही.-१५, सी.एस्.व्ही.-१७, पी.व्ही.के.-८०१ आणि सी.एस्.व्ही.-२३
२. गोड ज्वारी : एस्.एस्.व्ही. – ८४, एच्.ई.एस्. – ४, सी.एस्.व्ही.-१९ एस्.एस्., सी.एस्.एच.-२२ एस्.एस्., ए.के.एस्.एस्.व्ही.२२
३. संकरित : सी.एस्.एच्. -१, सी.एस्.एच्. -५, सी.एस्.एच्. -६, सी.एस्.एच्. -९, सी.एस्.एच्. -१३, सी.एस्.एच्. -१४, सी.एस्.एच्. -१६, सी.एस्.एच्. -१७, सी.एस्.एच्. -१८, सी.एस्.एच्. -२१, सी.एस्.एच्. -२३ आणि एस्.पी.एच्. -१५६७
१ उ. पेरणीची वेळ : मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वाफसा येताच लवकर पेरणी करावी. (शक्यतो जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करून घ्यावी.) पेरणी लवकर केल्यास खोड माशीचा उपद्रव न्यून होतो.
१ उ १. पेरणी : पेरणी तिफणीने किंवा दोन चाड्याच्या पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. हेक्टरी १० किलोग्रॅम बियाणे वापरावे. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी पहिली आणि २० ते २२ दिवसांनी दुसरी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे.
१ ऊ. खते
१ ऊ १. जैविक खते : १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ‘ॲझोटोबॅक्टर’ किंवा ‘ॲझोस्पिरीलम’ हे जिवाणू खत चोळावे. त्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते.
१ ऊ २. रासायनिक खते : १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. यापैकी निम्मे नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे अन् उरलेले ५० किलो नत्र ३० दिवसांनी द्यावे.
१ ए. अंतरपीके आणि क्रमवारपीके : पट्टा पद्धतीने तूर हे अंतर पीक २:१ या प्रमाणात घ्यावे (२ ओळी ज्वारीच्या आणि १ ओळ तुरीची किंवा २ पाभरी ज्वारीच्या आणि १ पाभर तुरीची पेरावी.), तसेच तूरऐवजी मूग, उडीद आणि चवळी यांसारखी अंतरपीकेही घेता येतात.
१ ऐ. पाणी व्यवस्थापन : ज्वारीच्या पिकास जोमदार वाढीचा काळ (२० ते २५ दिवस) पीक पोटरीत येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) आणि दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या अवस्थेत आवश्यकतेप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे. पाणी शक्यतो सारा पद्धतीने द्यावे.
१ ओ. आंतरमशागत : तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार १ ते २ खुरपण्या आणि २ कोळपण्या कराव्यात.
१ औ. कीड नियंत्रण : ज्वारीची पेरणी शक्यतो लवकर करावी. कीडग्रस्त रोपे उपटून टाकावीत. उन्हाळ्यात भूमीची खोल नांगरट करावी. कीड प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी, उदा. सुधारित वाण एस्.पी.व्ही.४६२, सी.एस्.व्ही.- १३, सी.एस्.व्ही.- १५, सी.एस्.व्ही.- २३ या खोडमाशी प्रतिबंधक वाणांची पेरणी करावी. आवश्यकता भासल्यास लिंबोळी तेल किंवा ५ टक्के लिंबोळी अर्काचे द्रावण फवारणीसाठी वापरावे, तसेच ‘क्लोरोपायरीफॉस’ (२ ते २.५ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात) कीटकनाशकाची फवारणी करावी. लष्करी अळी आणि कणसातील अळी यांच्या बंदोबस्तासाठी १.५ टक्के ‘क्लोरोपायरीफॉस’ भुकटी (पावडर) २० किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात धुरळणी करावी.
१ अं. कापणी आणि मळणी : कणसाचा दांडा पिवळा झाला आणि दाणे पक्व (दाणे टणक) झाल्यावर पीक तयार झाले, असे समजावे अन् कापणी करून घ्यावी. मळणी बैलांच्या साहाय्याने किंवा मळणी यंत्राने करून घ्यावी. दाणे २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यावेत आणि जाड प्लास्टिक पिशवीमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
१ क. उत्पन्न : सुधारित वाण २५ ते ३० क्विंटल प्रती हेक्टरी आणि संकरित वाण ४० ते ४५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.
२. मका
२ अ. भूमी आणि हवामान : मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी भूमी या पिकास योग्य आहे. या पिकास उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक घेऊ नये.
२ आ. पूर्वमशागत : एक खोल नांगरट आणि २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन १० ते १२ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात चांगले मिसळून द्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खताची आवश्यकता नसते.
२ इ. संकरित आणि संमिश्र वाण (जाती)
२ इ १. संमिश्रवाण – प्रभात, आफ्रिकन टॉल, शक्ती १, मांजरी, किरण, पंचगंगा, नवज्योत आणि करवीर.
२ इ २. संकरित वाण – डेक्कन १०३, १०५, गंगा ११, त्रिशूलता, जे.के. २४९२, प्रो. ३१०, ३११, ३१२ बायो ९६८१, सीडटेक २३२४, के.एच. ९४५१, एम्.एम्.एच्. ६९, एक्स. १०१३ जी
२ ई. पेरणी
१. पेरणीची वेळ : जून ते जुलै दुसरा आठवडा.
२. पेरणीची पद्धत : टोकण पद्धत – ७५ x २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी.
३. बियाणे : १५ ते २० किलो प्रती हेक्टरी
४. बीजप्रक्रिया : २ ते २.५ ग्रॅम ‘थायरम’ प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे आणि त्यानंतर ‘ॲझोटोबॅक्टर’ या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. (२५० ग्रॅम जिवाणू प्रती १० किलो बियाणे)
२ उ. आंतरपिके : मका + मूग किंवा उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमुग, तूर.
२ ऊ. खते : पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरण आणि ४० किलो पालाश प्रती हेक्टर, पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र अन् ५५ ते ६० दिवसांनी ४० किलो नत्र प्रती हेक्टर द्यावे. भूमीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.
२ ए. आंतरमशागत : आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी आणि १ ते २ वेळा कोळपणी करून ताणांचा बंदोबस्त करावा.
२ ऐ. पाणी व्यवस्थापन : पीकवाढीची अवस्था (२० ते ४० दिवस), फुलोरा अवस्था (४० ते ६० दिवस) आणि दाणे भरण्याची अवस्था (७० ते ८० दिवस) या काळात भूमीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास संरक्षित पाणी द्यावे.
२ ओ. पीकसंरक्षण : खोड पीक, मावा आणि तुडतुडे यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘क्लोरोपायरिफॉस’ (२ ते २.५ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात)ची फवारणी करावी. लष्करी अळी आढळून आल्यास लगेच १.५ टक्के ‘क्लोरोपायरिफॉस’ भुकटी (पावडर) २० ते २५ किलो प्रती हेक्टरी धुरळावी करावी.
२ औ. काढणी : कणसांवरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यावर आणि दाणे घट्ट झाल्यावर कणसे खोडून घ्यावीत. मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी करून दाणे २-३ दिवस उन्हात चांगले वाळवावेत आणि जाड प्लास्टिकच्या पिशवीत भरून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
२ अं. उत्पादन : ५० ते ५५ क्विंटल प्रती हेक्टर.
टीप : वरील जातीखेरीज मधुमका (स्वीटकॉर्न) या प्रकारच्या मक्याच्या लागवडीसाठी शुगर ७५, सुमधुर, अतिमधुर, माधुरी, सचरेता या जातींचा वापर करावा. यापासून हेक्टरी १५० ते १६० क्विंटल कणसाचे उत्पन्न मिळते. कणसे शिजवून किंवा भाजून वापर करता येतो.
शिशुमका (बेबी कॉर्न) साठी जी – ५४०६, माधुरी आणि मांजरी या जातींचा वापर करावा. यापासून ७० ते ८० दिवसांमध्ये कोवळी कणसे काढून १५ ते २० क्विंटल प्रती हेक्टर उत्पन्न मिळते. कणसे काढल्यानंतर मक्याच्या ताटांचा जनावरासाठी हिरवा चारा म्हणून उपयोग करता येतो.
३. बाजरी
३ अ. भूमी आणि हवामान : हे पीक सर्व प्रकारच्या भूमीवर घेता येते आणि पिकास उष्ण अन् कोरडे हवामान चांगले मानवते. जास्त पावसाच्या भूप्रदेशात हे पीक घेऊ नये.
३ आ. पूर्वमशागत : १५ सें.मी. खोलीपर्यंत नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात आणि ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात चांगले पसरावे अन् भूमीत मिसळावे.
३ इ. सुधारित आणि संकरित वाण
१. सुधारित वाण : आयसीटीपी ८२०३, आयसीएम्व्ही १५५.
२. संकरित वाण : श्रद्धा, सबुरी आणि शांती
३ ई. पेरणी
१. पेरणीची वेळ : १५ जून ते १५ जुलै
२. बियाणे : ३ ते ४ किलो प्रती हेक्टर
३ उ. बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाणे २० टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात २ किलो मीठ या प्रमाणात) बुडवून चांगले ढवळावे आणि वर तरंगणारे रोगट अन् हलके बियाणे बाजूला काढून टाकावे. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर २५० ग्रॅम ‘ॲझोस्पिरीलम’ प्रती १० किलो बियाण्यास या प्रमाणात चोळून नंतर पेरणी करावी. यामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.
३ ऊ. पेरणीचे अंतर : ४५ x १५ सें.मी. अंतरावर पाभरीच्या साहाय्याने करावी.
३ ए. आंतरपीक : हलक्या भूमीत बाजरी + मटकी आणि मध्यम भूमीत बाजरी + तूर (२:१ प्रमाणात) आंतरपीक घ्यावे.
३ ऐ. आंतरमशागत : १० दिवसांनी पहिली आणि २० दिवसांनी दुसरी विरळणी करून १५ सें.मी. अंतरावर एकच रोप ठेवावे.
१ ते २ वेळा खुरपणी आणि १ ते २ वेळा कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.
३ ओ. रासायनिक खते : ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे.
३ औ. पाणी व्यवस्थापन : पिकास फुटवे फुटण्याच्या वेळी (२० ते २५ दिवस), पीक पोटरीत असतांना (३५ ते ४० दिवस) आणि दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस) पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.
३ अं. कापणी आणि मळणी : कणसातील दाणे घट्ट झाल्यानंतर ताटे कापून घ्यावीत. कणसे खुडून घ्यावीत आणि यंत्राच्या साहाय्याने मळणी करावी अन् दाणे २-३ दिवस उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२२)