पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची अद्भुत आणि बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये !
आज १ जुलै २०२२ या दिवशी पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथ रथयात्रा आहे. त्या निमित्ताने…
१ जुलै २०२२ या दिवशी पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथाची रथयात्रा आहे. या यात्रेची अद्भुत आणि बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये, तसेच श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्यामागील कारण येथे देत आहोत.
१. श्री जगन्नाथाचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. अनुमाने ८०० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराचे वास्तूकौशल्य इतके भव्य आहे की, त्याविषयी संशोधन करण्यासाठी जगभरातून वास्तूतज्ञ या मंदिराला भेट देतात.
२. हे तीर्थक्षेत्र भारताच्या ४ पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
३. श्री जगन्नाथाच्या मंदिराची उंची २१४ फूट इतकी आहे. मंदिराचे क्षेत्रफळ ४ लाख वर्गफुटात पसरलेले आहे.
४. पुरी येथील कोणत्याही ठिकाणावरून मंदिराच्या कळसावर असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्यासमोरच असल्याचे जाणवते.
५. मंदिरावर असलेला झेंडा नेहमीच हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. (प्रत्येक सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर कीस पाडणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मंदिर म्हणजे एक चपराकच आहे ! यातून हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व लक्षात येते ! – संपादक) प्रतिदिन सायंकाळी मंदिरावरील झेंडा पालटण्यात येतो.
६. सामान्यत: प्रतिदिन हवा समुद्राकडून भूमीच्या दिशेने येते आणि सायंकाळी त्याच्याविरुद्ध जाते; परंतु पुरी येथे त्याच्या उलट प्रक्रिया घडते.
७. मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी अदृश्यच असते.
८. येथे पक्षी किंवा विमाने मंदिरावरून उडतांना कधीही दिसणार नाहीत.
९. मंदिरात भोजनासाठी वर्षभर पुरेल इतकी अन्नसामुग्री असते. विशेष म्हणजे महाप्रसाद जराही वाया जात नाही. लाखो भाविक हा प्रसाद मोठ्या भक्तीभावाने ग्रहण करतात.
श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य प्रथम अर्पण करण्यामागील कारणकर्माबाई नावाची जगन्नाथाची मोठी भक्त होऊन गेली. ती गरीब असल्याने खिचडी बनवायची. भगवान जगन्नाथ प्रतिदिन सकाळी कर्माबाईच्या घरी खिचडी खाण्यासाठी जात असत. ज्या दिवशी कर्माबाईंनी देह सोडला, त्या दिवशी जगन्नाथाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते दृश्य सर्व पुजार्यांनी पाहिले. देवाने पुजार्यांना सांगितले, ‘‘कर्माबाई मला प्रतिदिन सकाळी खिचडी द्यायची. यापुढे मला खिचडी कोण देणार ?’’ तेव्हा सर्व पुजारी म्हणाले, ‘‘देवा, यापुढे आम्ही तुला प्रतिदिन खिचडीचा नैवेद्य देऊ.’’ तेव्हापासून श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य प्रथम अर्पण करण्यात येऊ लागला. |
या मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील अन्य मंदिरांत असणार्या स्वयंपाकघरापेक्षा सर्वांत मोठे आहे. येथे महाप्रसाद करतांना मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. सर्व अन्न लाकडाद्वारे प्रज्वलित केलेल्या अग्नीवरच शिजवले जाते.
या विशाल स्वयंपाकघरामध्ये भगवान जगन्नाथाला आवडणारा महाप्रसाद बनवण्यात येतो. यासाठी ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० साहाय्यक एकाच वेळी सेवा करतात. |