‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘एकेरी अवतरणचिन्ह’ आणि ते वापरण्याची पद्धत !
प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘उद्गारवाचकचिन्हा’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘एकेरी अवतरणचिन्ह (‘ ’) कुठे द्यावे ?’, याविषयी जाणून घेऊ.
(लेखांक ८ – भाग ९)
२ ऐ. एकेरी अवतरणचिन्ह : हे ‘ ’ या खुणेने दाखवले जाते. जे लिखाण ‘एकेरी अवतरणचिन्हा’त घ्यावयाचे असते, त्या लिखाणाच्या आरंभी ‘ ही खूण करतात आणि लिखाण संपल्यानंतर ’ ही खूण केली जाते. भाषा लिहितांना ‘एकेरी अवतरणचिन्हा’चा उपयोग पुढीलप्रमाणे केला जातो.
२ ऐ १. वाक्यात त्याच्या अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नाव, एखादी पदवी, संज्ञा इत्यादींचा उल्लेख येणे : वाक्यात त्याच्या अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले एखादे नाव; ग्रंथ, संघटना, वृत्तपत्रे इत्यादींची नावे; एखादा वैशिष्ट्यपूर्ण शब्द किंवा संज्ञा (पारिभाषिक शब्द) यांचा उल्लेख आला असेल, तर तो एकेरी अवतरणचिन्हात लिहावा. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. ‘देवव्रत’ हे पितामह भीष्म यांचे मूळ नाव होते.
आ. साधना म्हणून पौरोहित्य करणार्यांना ‘साधक-पुरोहित’ असे म्हणतात.
इ. कै. शांता शेळके यांचे ‘चौघीजणी’ हे पुस्तक फार सुंदर आहे.
ई. श्री. जोशीकाका दैनिक ‘सनातन प्रभात’चे जुने वाचक आहेत.
२ ऐ २. सनातनच्या वाङ्मयात एकेरी अवतरणचिन्हाचा केला जाणारा उपयोग !
२ ऐ २ अ. लेखनात महनीय व्यक्तींचे विचार मांडावयाचे असणे : लेखन करतांना विविध ठिकाणी आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या थोर व्यक्ती, संत आदींचे प्रबोधनात्मक विचार जसेच्या तसे मांडावयाचे असतात. या विचारांपुढे त्यांची नावेही लिहावयाची असतात. अशा वेळी महनीय व्यक्तींचे विचार एकेरी अवतरणचिन्हात लिहावेत आणि अवतरणचिन्ह पूर्ण केल्यावर पुढे संयोगचिन्ह (-) लिहून संबंधित व्यक्तींची नावे लिहावीत. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
‘निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे !’ – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, कल्याण, ठाणे.
या सूत्र क्र. ‘२ ऐ २ अ’नुसार एखाद्या व्यक्तीने एखादा मोठा लेख लिहिला असेल, तरी त्या लेखाच्या आरंभी एकेरी अवतरणचिन्ह चालू करावे आणि लेखाच्या अखेरीस ते पूर्ण करावे. त्यानंतर लेखकाचे नाव लिहावे.
२ ऐ २ आ. एखाद्या पुस्तकातील एखादा उतारा जसाच्या तसा घेणे : एखाद्या पुस्तकातील एखादा उतारा जसाच्या तसा घेतला असेल, तर तो एकेरी अवतरणचिन्हात लिहावा. उतार्याच्या शेवटी अवतरणचिन्ह संपवून मग पुस्तकाचा संदर्भ द्यावा. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
‘कथ्थक नृत्य हे उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब इ. प्रांतांत प्रसिद्ध आहे. हे उत्तरप्रदेशाचे शास्त्रीय नृत्य आहे. ‘कथ्थक’ शब्दाची उत्पत्ती ‘कथा’ या शब्दावरून झाली. ‘कथन करणारा तो ‘कथ्थक’, असे नाव पडले. कथ्थक नृत्याची परंपरा प्राचीन आहे. मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील खोदकामात नृत्य करणार्या स्त्रियांच्या मूर्ती सापडल्या. त्यांच्या मुद्रांवरून लक्षात येते की, त्या कथ्थक करीत असाव्यात.’ (साभार : सौ. मंजिरी देव लिखित पुस्तक ‘नृत्यसौरभ’)
२ ऐ २ इ. मनातील गोष्टी आणि सूक्ष्मातून जाणवलेल्या गोष्टी लिहिणे : मनातील विचार, भावना, कल्पना, मनाला जाणवलेल्या गोष्टी, मिटलेल्या डोळ्यांसमोर दिसलेली दृश्ये आणि सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये एकेरी अवतरणचिन्हात लिहावीत. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. अरविंदने विचार केला, ‘एवढ्या उशिरा महाविद्यालयात जाण्यापेक्षा बाबांचे काम पूर्ण करून द्यावे.’
२. मित्राचे बोलणे ऐकून राजला वाटले, ‘प्रत्यक्ष देवच याच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे.’
३. संतांचे आगमन झाल्यावर मधुराला ‘देवता संतांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले.
४. ‘देव सतत माझ्यासोबत आहे’, असे आदित्यला नेहमी वाटते.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२२)