सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !
१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…
१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे जीव सात्त्विक आहेत. त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अलौकिक गुरूंचे मार्गदर्शन लाभल्यामुळे त्या जिवांच्या जन्मांचे सार्थक झाले आहे. पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि ‘त्यांची अपार कृपा कशी कार्य करते ?’ हे या साधनाप्रवासातून पहाणार आहोत. अर्थात् परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु आणि उत्तरदायी साधक यांच्या माध्यमातून जे काही सांगितले आणि शिकवले ते पू. रत्नमालाताईंनी त्वरित शिकून आचरणात आणून केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वपूर्ण, अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहेत. त्यातून त्यांची शिकण्याची वृत्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धाच दिसून येते. यातून ‘साधनेत श्रद्धाच मनुष्याला तारून नेते’, हेही शिकता येते.
१. जन्म आणि बालपण
१ अ. जन्म : माझा जन्म चैत्र कृष्ण त्रयोदशी (१६.४.१९७७) या दिवशी तिवरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या गावी झाला.
१ आ. प्रकृती चांगली नसणे : लहानपणापासूनच मी अनेक वेळा रुग्णाईत असायचे. साधारण वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत मला काविळ, मलेरिया, विषमज्वर (टायफॉईड), कांजिण्या, गोवर, असे आजार झाले आहेत. जन्मतःच माझ्या हृदयाच्या पडद्याला छिद्र होते. वर्ष २००३ मध्ये त्यावरील शस्त्रकर्म झाल्यावर त्याविषयीचा त्रास बंद झाला.
१ इ. देवाची आवड असणे : माझ्या कुटुंबातील वातावरण धार्मिक आहे. कुटुंबात सर्व सण, उत्सव, कुलाचार धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे मला लहानपणापासूनच देवाविषयी आवड होती.
२. शिक्षण
माझे कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण (बी.ए.) पूर्ण झाले आहे.
३. लहानपणापासून नीटनेटके रहायला आवडणे
मला लहानपणापासूनच नीटनीटकेपणाची सवय आणि आवड आहे. प्रत्येक वस्तू त्या त्या जागेवर ठेवायला, वस्तू आणि कपडे यांचा वापर चांगल्या प्रकारे करायला मला आवडते. मला अनावश्यक व्यय करायला आवडत नाही.
४. सनातन संस्थेशी झालेला संपर्क !
४ अ. सनातन संस्थेशी संपर्क होऊन साधनेला आरंभ होणे : वर्ष १९९९ मध्ये मला काही साधकांकडून सनातन संस्थेची माहिती मिळाली. ‘सनातन संस्था देवाचेच करायला सांगत असल्यामुळे मी सत्संगाला जायला आरंभ केला. सत्संगात कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व कळल्यावर मी ते नामजप करायला आरंभ केला. त्यापूर्वी मी कधीही कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केला नव्हता.
४ आ. सेवेला आरंभ होणे : वर्ष २००० पासून मी सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवेला आरंभ केला. आरंभी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत नामजप आणि सेवा करायला आरंभ केला. काही दिवस मी मंदिरातील उत्सवांच्या वेळी ग्रंथप्रदर्शन, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, गुरुपौणिमेनिमित्त अर्पण जमा करणे, अशा सेवा केल्या. माझी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू असतांना रत्नागिरी येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाहीर सभा होणार होती; परंतु परीक्षा असल्याने मी या सभेला गेले नाही. माझे वडील या सभेला गेले होते. सभेहून आल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सभा यांविषयी आम्हाला सांगितले. तेव्हा ‘मी साधनेतील एक चांगली संधी गमावली’, याची मला आता जाणीव होत आहे.
४ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचनामुळे सेवेची ओढ लागणे आणि पुढील शिक्षणाच्या मायेत न अडकता पूर्णवेळ सेवा करण्यास आरंभ होणे : माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया चालू होती. तेव्हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचत असे. त्यामुळे माझ्या मनामध्ये ‘शिक्षणापेक्षा सेवा करूया’, असा विचार येऊ लागला. त्यामुळे मी पुढील शिक्षण न घेता साधना करण्याचे ठरवले. मी रत्नागिरी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात सेवेला जाण्यास आरंभ केला. फेब्रुवारी २००२ पासून श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझा पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ झाला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी येथील कार्यालयात आलेल्या वार्तांचे टंकलेखन करणे, दैनिक आणि विज्ञापने यांची संरचना करणे, यांसह दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाशी संबंधित सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.
४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन ! : वर्ष २००२ मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या सर्वसंप्रदाय सत्संगासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले रत्नागिरी येथे आले होते. तेव्हा प्रवेशद्वारापाशी परात्पर गुरु डॉ. आठवले गाडीतून उतरत असतांना मला त्यांचे प्रथम दर्शन झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले येण्याच्या काही वेळ आधीपासूनच माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता आणि वातावरणातही पुष्कळ शांतता अनुभवता येत होती.
५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवणे
वर्ष २००३ मध्ये मी देवद आश्रमात रहायला आले. वर्ष २०१६ पासून परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडे माझ्यासह काही सहसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाला. तेव्हापासून माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेला खर्या अर्थाने आरंभ झाला. त्यांनी माझ्या मनावर व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे माझ्या मनामध्ये व्यष्टी साधनेचा संस्कार निर्माण होऊन माझ्यामध्ये व्यष्टी साधनेसाठी प्रयत्न करण्याची गोडी निर्माण झाली.
६. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्वभावदोषांचे निर्मूलन आणि गुणसंवर्धन करण्यास शिकवणे
सद्गुरु राजेंद्रदादा यांनी मला माझ्यातील स्वभावदोषांची नेमकपेणाने जाणीव करून देऊन ‘त्यातून कसे बाहेर पडायचे ?’, हे शिकवले. तसेच ‘समष्टी साधनेच्या दृष्टीने माझ्यामध्ये कोणत्या गुणांचा अभाव आहे आणि ते गुण वाढवण्यासाठी मी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हेही त्यांनी मला शिकवले.
६ अ. स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी केलेले प्रयत्न !
६ अ १. साधकांकडून ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषाची तीव्रता अधिक असल्यामुळे चिडचिड होऊन साधकांविषयी पूर्वग्रह निर्माण होणे : माझ्यामध्ये ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे माझ्यासह सेवा करणारे आश्रमातील साधक आणि जिल्ह्यातील साधक यांच्याकडून माझ्या सेवेविषयी पुष्कळ अपेक्षा असायच्या अन् माझ्या मनातील त्या विषयीच्या विचारांचा कालावधीही अधिक वेळ टिकून रहायचा. तेव्हा माझ्या मनात ‘या अपेक्षा किंवा हे विचार केवळ सेवेच्या अनुषंगानेच आहेत. यामध्ये माझा वैयक्तिक लाभ नाही’, असा चुकीचा विचार असायचा; पण ‘त्यामुळे माझी साधनेत हानी होत आहे ?’, याकडे माझे लक्ष नसायचे. त्यामुळे हा स्वभावदोष न्यून करण्यासाठी माझ्याकडून तितक्या गांभीर्याने प्रयत्न होत नव्हते. या स्वभावदोषामुळे तेच तेच प्रसंग पुनःपुन्हा घडल्यावर माझी चिडचिड होत असे आणि ते विचार माझ्या मनात राहून त्या त्या साधकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह निर्माण होत असे.
६ अ २. व्यष्टी साधनेत मिळत असलेले मार्गदर्शन आणि जिल्ह्यातील साधकांशी वाढलेला समन्वय यांमुळे साधकांना समजून घेता येऊ लागणे : आम्ही करत असलेली सेवा ही पूर्णपणे जिल्ह्यातील साधकांच्या सेवांवर अवलंबून असते. त्यामुळे जिल्ह्यातून माहिती येण्यास विलंब झाला किंवा आलेल्या माहितीमध्ये चुका असल्यास माझी चिडचिड व्हायची. माझ्या साधकांकडून अपेक्षा व्हायच्या. माझा साधकांना समजून घेण्याचा भाग पुष्कळच अल्प होता. माझा जिल्ह्यांशी असलेला समन्वय वाढत गेला आणि मला व्यष्टी साधनेसाठी सद्गुरु राजेंद्रदादांचे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे) मार्गदर्शन मिळू लागले, तसतशा माझ्या मनातील अपेक्षा अन् चिडचिड न्यून होऊ लागली. माझ्याकडून साधकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न होऊ लागला. परिणामी साधकांविषयी जवळीक निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. ‘जिल्ह्यातील साधकही शिकत आहेत. त्यांना समजून घ्यायला हवे’, अशी माझी विचारप्रक्रिया होऊ लागली.
६ अ ३. प्रसंग घडल्यावर मनाचा अभ्यास केल्यावर अयोग्य विचारांची जाणीव होणे आणि ‘देवाला या प्रसंगातून काय शिकवायचे आहे ?’, असा विचार होऊन ते शिकता येणे : सद्गुरु राजेंद्रदादांकडे माझा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषामुळे माझ्या साधनेची हानी होत आहे आणि मी देवाच्या अनुसंधानापासून दूर जात आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव होऊ लागली. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. ‘इतरांना समजून घेतल्यास अपेक्षेचे विचार लगेच न्यून होतात’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझ्या मनात अपेक्षेचे विचार आल्यावर ‘मला या विचारांमध्ये अडकायचे नाही. तेवढा वेळ मी देवापासून दूर जाणार आहे’, असा माझा विचार होण्यास आरंभ झाला. कुणाविषयीही माझ्या मनात प्रतिक्रिया आल्यावर मला माझ्या मनाचा अभ्यास करता येऊ लागला. ‘माझी चिडचिड होत नाही ना ? माझ्या साधनेच्या दृष्टीने योग्य काय आहे ?’, असा विचार करण्यास मला जमू लागले. त्यामुळे माझ्या मनात साधकांविषयी असलेल्या पूर्वग्रहाचे विचार न्यून होण्यास आरंभ झाला. एखादा प्रसंग घडल्यावर त्या प्रसंगात ‘मी कुठे न्यून पडले आहे, हे देवाला मला दाखवून द्यायचे आहे’, असा विचार मनात येऊन ‘त्या प्रसंगातून देवाला मला काय शिकवायचे आहे ?’, हे माझ्या लक्षात यायला लागले.’ (क्रमशः)
– (पू.) कु. रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२२)