पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेस १ जुलैपासून आरंभ !
पुरी (ओडिशा) – येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा १ जुलैपासून, म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ होणार आहे. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे. ते ८०० वर्षांहून अधिक जुने आहे. येथे भगवान श्रीकृष्ण श्री जगन्नाथाच्या रूपात विराजमान आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांचीही येथे पूजा केली जाते.
Jagannath Puri Rath Yatra 2022 Date, Time & Live Streaming Online: Watch Live Telecast of Chariot Festival and Get Darshan of Lord Jagannath, Lord Balabhadra and Devi Subhadra at Festival Held in Odisha#JagannathRathYatra #RathaYatra https://t.co/txe1Z4023H
— LatestLY (@latestly) June 30, 2022
१. रथयात्रेसाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी तीन स्वतंत्र रथ सिद्ध करण्यात आले आहेत. जेव्हा रथयात्रा चालू होते, तेव्हा बलरामाचा रथ पुढे, देवी सुभद्राचा रथ मध्यभागी आणि भगवान श्री जगन्नाथाचा रथ मागे असतो.
२. बलरामाच्या रथाला ‘तलध्वज’ म्हणतात. त्याच्या रथाचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला ‘दर्पदालन’ किंवा ‘पद्मरथ’ म्हणतात, ज्याचा रंग काळा किंवा निळा आहे. भगवान श्री जगन्नाथाच्या रथाला ‘नंदीघोष’ किंवा ‘गरुडध्वज’ म्हणतात, ज्याचा रंग लाल किंवा पिवळा आहे.
३. जेव्हा तिन्ही रथ सिद्ध होतात तेव्हा ‘छर पहानरा’ नावाचा विधी केला जातो. पुरीचा गजपती राजा पालखीतून येथे येतो आणि या तीन रथांची पूजा करतो आणि नंतर सोन्याच्या झाडूने रथाचा मंडप आणि मार्ग स्वच्छ करतो.
४. ढोल-ताशा वाजवून भाविक हे रथ ओढतात. असे मानले जाते की, ज्यांना रथ ओढण्याची संधी मिळते ते फार भाग्यवान असतात. पौराणिक मान्यतेनुसार जो रथ ओढतो, त्याला मोक्षप्राप्ती होते.
५. रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून चालू होऊन गुंडीचा मंदिरापर्यंत जाते. येथे पोचल्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा ७ दिवस विश्रांती घेतात. गुंडीचा मंदिरात जेव्हा भगवान श्री जगन्नाथाचे दर्शन होते, तेव्हा त्याला ‘आडप दर्शन’ म्हणतात.
६. गुंडीचे मंदिर हे भगवान श्री जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे. याला ‘गुंडीचा बाडी’ असेही म्हणतात. शुक्ल पक्ष एकादशीला भगवान श्री जगन्नाथ परत मंदिरात येतात. यासह यात्रेचा प्रवास संपतो. परत आल्यानंतर सर्व मूर्ती रथातच रहातात. एकादशीच्या दुसर्या दिवशी देवतांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. यानंतर विधिवत् स्नान करून नामजपाच्या वेळी देवतेची पुनर्स्थापना केली जाते.