लोणंद (जिल्हा सातारा) येथे विनाअनुमती उभारलेले पाळणे काढण्यास प्रारंभ !
सातारा, २९ जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथील गोटे माळावर विनाअनुमती उभारण्यात येणारे पाळणे काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
याविषयी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक महसूल, पोलीस आणि नगरपंचायत अधिकारी यांना आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मांढरदेव यात्रेनंतर लोणंद येथे कधीही पाळणे उभारण्यात आले नाहीत; मात्र तरीही नंतरच्या काळात सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवत पाळणे उभारून काही जण लाखो रुपयांची कमाई करत होते. या वेळी लोणंद येथील जागृत प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने देऊन हे पाळणे काढण्याविषयी विनंती केली होती. याचाही काही परिणाम झाला नाही. जेव्हा याविषयी वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या, सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांतून आवाज उठवला गेला, तेव्हा प्रशासनाला खडबडून जाग आली आणि विनाअनुमती उभारण्यात आलेले पाळणे काढण्याची कारवाई चालू झाली.