खताचा साठा केल्यास दुकानदारांवर गुन्हे नोंद करा ! – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
सोलापूर, २९ जून (वार्ता.) – जिल्ह्यामध्ये शेतकर्यांना खरीप हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरक यांनी शेतकर्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत. डीएपी आणि युरिया खताचा साठा केल्याचे आढळल्यास दुकानदारांवर गुन्हे नोंद करण्याचे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
१. जिल्हाधिकारी कार्यालयात युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा शेतकर्यांना वितरित करण्याविषयीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध खत आस्थापने, बियाणे उत्पादक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खतांच्या प्रत्येक गाडीला ‘जी.पी.एस्. सिस्टीम’ सक्तीची करण्याच्या सूचना या वेळी जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
२. शंभरकर यांनी सांगितले की, यंदा अजूनही मोठ्या पावसाने हजेरी लावली नसली, तरी काही तालुक्यांत खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढत आहे. यामुळे बी-बियाणे आणि खते यांची मागणी वाढत आहे. शेतकर्यांना मागणीप्रमाणे खते आणि बियाणे उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे. खते-बियाणे या आस्थापनांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून खतांचा साठा अन्य जिल्ह्यांत जाणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी.
संपादकीय भूमिका
|