कुर्ला येथील इमारत दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू !
मृतांना ५ लाख रुपयांचे साहाय्य !
मुंबई – कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील ४ मजली इमारत दुर्घटनेमध्ये सायंकाळी ६ पर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप शोधकार्य चालू असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.
२७ जूनच्या रात्री ११.३० वाजता ही इमारत कोसळली. याविषयी माहिती मिळताच अग्नीशमनदल आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य चालू केले. ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. घायाळ लोकांवर राजावाडी आणि शीव या रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत.
आमदार एकनाथ शिंदे यांचा गट आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडूनही मृतांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या चारही इमारतींमध्ये कुणीही राहू नये, अशी नोटीस दिली होती; मात्र तरीही तेथे १० कुटुंबे रहात होती. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा ‘नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये’, असे आवाहन केले आहे.