कराड (जिल्हा सातारा) येथे मोकाट कुत्र्यांच्या आक्रमणात मुलाचा मृत्यू !
सातारा, २८ जून (वार्ता.) – येथे अंगणात खेळणाऱ्या राजवीर ओव्हाळ (वय अडीच वर्षे) याच्यावर मोकाट कुत्र्यांनी आक्रमण केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. (मोकाट कुत्र्यांची समस्या प्रशासन किती आक्रमणे झाल्यावर सोडवणार ? – संपादक) कु. राजवीरचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, तर आई शेतात काम करत होती. राजवीर बहिणीसमवेत खेळत होता. काही वेळाने बहिणीला राजवीर दिसेनासा झाला. बहिणीने शोधाशोध केली. तेव्हा उसाच्या फडात राजवीर कुत्र्यांच्या झुंडीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित केले.