‘सांगली अर्बन बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सत्ताधारी प्रगती पॅनल’ विजयी !
सांगली, २८ जून (वार्ता.) – ‘सांगली अर्बन बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ‘स्व.म.ह. तथा अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनल’चे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी बापूसाहेब पुजारी गटाचा पराभव झाला आहे. विजयी उमेदवारांमध्ये सर्वश्री गणेश गाडगीळ, सत्यनारायण मालू, रणजित चव्हाण, हरिदास कालिदास, अनंत मानवी, हणमंतराव पाटील, शैलेंद्र तेलंग, संजय धामणगावकर, संजय पाटील, श्रीपाद खिरे, श्री.क. देशपांडे, सौ. अ.ज. आठवले, सौ. स्वाती करंदीकर, सा.मु. घोंडगे, म.बा. कोरडे, र.वि. भाकरे यांचा समावेश आहे. सत्ताधारी गटातील सर्वच्या सर्व म्हणजे १६ उमेदवार विजयी झाले आहेत.
२६ जून या दिवशी बँकेच्या ६० सहस्र ३३ सभासदांपैकी केवळ १२ सहस्र ९२९ मतदारांनी (२१.५३ टक्के) मतदान केले होते. बँकेत १७ संचालक असून सत्ताधारी गटातील डॉ. रवींद्र आरळी यांची या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. सत्तारूढ गटाचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष श्री. गणेशराव गाडगीळ हे करत होते, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व बापूसाहेब पुजारी आणि माजी अध्यक्ष प्रमोद पुजारी करत होते. बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर यांसह मराठवाडा येथील परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांतही आहे.