राज्यातील अस्थिर परिस्थितीतही अध्यादेश काढून पैसे कमावण्याचे उद्योग ! – सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप
भाजपचे राज्यपालांना पत्र !
नागपूर – राज्यातील अस्थिर परिस्थितीतही काही लोक स्थिर मनाने शासन निर्णय लागू करत सध्याच्या परिस्थितीत पैसे कमावण्याचे उद्योग करत आहेत, अशी शंका आल्याने भाजपच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. २८ जून या दिवशी भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी येथे आले असता ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यपालांना एखादा पक्ष वा समूह यांच्याकडून एखादे निवेदन वा पत्र दिल्यानंतर त्या संदर्भातील माहिती मागवणे हे त्यांचे कर्तव्य असते. याचा अर्थ राज्यपालांनी आक्षेप घेतला किंवा चुकीचे केले, असा होत नाही. राज्यपालांनी २२ ते २४ जून या कालावधीत काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती मागवण्यात चूक नाही. कोणत्याही पत्राच्या संदर्भात प्रशासनाकडून माहिती किंवा खुलासा करून घेणे, हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, राज्यपालांनी सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यासाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे. आपल्याकडे बहुमत आहे कि नाही, हे त्यांनी समजून घ्यावे, तसेच त्यांनीच जनहिताचा योग्य निर्णय करावा.