गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या ११९ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !
१. सौ. सत्याली देव, चंद्रपूर
१ अ. आज्ञापालन करणे : ‘एकदा पू. पात्रीकरकाकांनी डगवारकाकूंना ‘वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांची विचारपूस करा’, असे सांगितले. तेव्हापासून काकू प्रत्येक १ – २ दिवसांनी साधकांना भ्रमणभाष किंवा लघुसंदेश करून त्यांची विचारपूस करतात.
१ आ. प्रेमभाव
१. काकूंमधील प्रेमभाव त्यांचे बोलणे आणि त्यांची प्रत्येक कृती यांतून व्यक्त होतो. एकदा समाजातील २ व्यक्तींनी काकूंना एकदाच भेटूनही ‘‘या किती सात्त्विक आहेत आणि यांच्यात किती प्रेमभाव आहे !’’, असे उद्गार काढले .
२. मला वाईट शक्तींचा त्रास होत असतांना कोणाशी बोलावेसे वाटत नाही; परंतु काकूंमधील प्रेमभावामुळे मला त्यांना सर्व सांगता येते. त्या माझी आईप्रमाणे काळजी घेतात.
१ इ. साधनेत साहाय्य करणे : वाईट शक्तींच्या त्रासामुळे माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. त्या वेळी मी कितीही नकारात्मक बोलले, तरी काकू प्रत्येक वेळी मला सकारात्मक दृष्टीकोन देतात. मी काकूंशी थोडा वेळ बोलल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होतात. त्रासामुळे माझ्याकडून साधनेचे प्रयत्न आणि सेवा होत नाही. तेव्हा काकू मला सतत प्रोत्साहन देतात. त्यामुळे मला काही प्रयत्न करणे शक्य होते.
१ ई. अल्प अहं : काकू प्रत्येक व्यक्तीकडून आणि प्रत्येक प्रसंगात शिकण्याच्या स्थितीत असतात. त्या सतत इतरांमधील गुण बघतात. एखाद्याची चांगली कृती लक्षात आली असेल, तर काकू त्यांचे कौतुक करतात आणि ‘मला हे जमत नाही’, असे म्हणून स्वतःकडे न्यूनपणा घेतात.
१ उ. शिकायला मिळालेली सूत्रे : काकूंकडून मला ‘परिपूर्ण नियोजन कसे करायचे ? वैयक्तिक अडचणींवर मात कशी करायची ? प्रसंगात न अडकता साधनेला कसे प्राधान्य द्यायचे ?’, हे शिकायला मिळाले.
१ ऊ. काकूंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. मी काकूंशी माझ्या वाईट शक्तींचा त्रासाविषयी बोलत असतांना अनेक वेळा मला चैतन्य मिळून त्रास न्यून होतो.
२. एकदा मी कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूर येथे गेले होते. तेव्हा श्री रेणुकामातेच्या ठिकाणी मला काकू दिसत होत्या. ‘मला असे का दिसत आहे ?’, असा मी विचार केला. तेव्हा ‘उत्तरदायी साधिका अन्य साधकांची आईच असते आणि ती आपल्याला गुरुदेवांपर्यंत नेत असते’, असे उत्तर मला सुचले.
१ ए. काकूंच्या ‘मंदाकिनी’ या नावाचा सुचलेला भावार्थ !
मं – मंजुळ आवाज
दा – दास्यभाव
कि – कितीही कठीण प्रसंग असला, तरी स्थिर रहाणे
नी – नियोजनकौशल्य
२. श्री. गुणवंत चंदनखेडे, चंद्रपूर
अ. ‘डगवारकाकू सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या समवेत चंद्रपूरला आल्या असतांना त्यांची माझ्याशी ओळख झाली. या पहिल्या भेटीतच काकू साधकांना आईप्रमाणे प्रेम देत होत्या. त्या सर्वांशी मृदु भाषेत आणि प्रेमाने बोलतात.
आ. त्यांच्यामध्ये ‘तत्परता, नम्रता, प्रेमभाव, ‘साधकांची योग्य साधना व्हावी’, हा ध्यास; गुरूंप्रती शरणागती’, हे गुण आढळतात. ‘त्या गुरुदेवांच्या प्रत्येक शिकवणुकीशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते.’
ही सूत्रे लिहितांना माझी सतत भावजागृती होत होती.’
(लेखातील सर्व सूत्रे पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार संतपदी विराजमान होण्यापूर्वीची असल्याने त्यांना ‘पूज्य’ असे संबोधले नाही.)
(क्रमश:)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १५.१२.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |